अष्टविनायक तीर्थक्षेत्रांचा प्राधान्याने विकास करण्यासाठी प्रयत्नशील – विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

अलिबाग,जि.रायगड,१२ डिसेंबर/प्रतिनिधी:-तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे अष्टविनायक क्षेत्र हे श्रद्धेचे ठिकाण आहे. या सर्व अष्टविनायक तीर्थक्षेत्रांचा तसेच इतर तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज पाली येथे केले.
सुधागड पाली येथील सुप्रसिद्ध बल्लाळेश्वर अष्टविनायक तीर्थक्षेत्रास त्या भेट देण्यास आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. किशोर जैन, रवींद्र देशमुख, पंचायत समिती सदस्य रमेश सुतार, तहसिलदार दिलीप रायन्नावार, गटविकास अधिकारी विजय यादव, उपसरपंच श्री. विनय मराठे, देवस्थान ट्रस्टी
श्री.उपेंद्र कानडे, श्री.सचिन साठे आदी उपस्थित होते.
उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी पाली बल्लाळेश्वर मंदिराच्या विकास कामांसंबंधीचा सविस्तर आढावा घेतला व लवकरच ही विकास कामे मार्गी लावण्यासाठी टप्प्याटप्प्याने मंत्रालय स्तरावर बैठका घेऊन कामे पूर्ण केली जातील, असे सांगितले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजना, तीर्थक्षेत्र विकास आराखडयानुसारची कामे, बायपास रस्ता इत्यादी प्रलंबित विषयांबाबत पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे सांगितले.