लोकांनी आपल्या मातृभाषेत बोलण्याचा अभिमान बाळगावा : उपराष्ट्रपती

एखाद्याची ओळख निर्माण करण्यासाठी मातृभाषेचे महत्त्व केले अधोरेखित

विविध भारतीय भाषांमधील साहित्यकृतींचा अनुवाद करण्यासाठी सक्रिय पुढाकार घेण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

भारतीय भाषांमध्ये प्रगत संशोधनाच्या गरजेवर उपराष्ट्रपतींचा भर

Image

नवी दिल्ली,१२ डिसेंबर/प्रतिनिधी:-उपराष्ट्रपती, एम. वेंकैया नायडू यांनी आज विविध भारतीय भाषांमधील अभिजात साहित्यिकांच्या अनुवादांची संख्या वाढवण्यासाठी सक्रिय आणि एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या संदर्भात, त्यांनी प्रादेशिक भारतीय साहित्याचा समृद्ध वारसा लोकांपर्यंत त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेत पोहोचवण्यासाठी भाषांतरात तांत्रिक प्रगतीचा लाभ घेण्याचा सल्ला दिला.

Image

विशेषतः, श्री कृष्णदेवराय यांच्या ‘अमुक्तमल्यादा’ सारख्या अभिजात साहित्याचा इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी पोट्टी श्रीरामुलू तेलुगू विद्यापीठासारख्या संस्थांच्या प्रयत्नांची नायडू यांनी प्रशंसा केली. भारतातील विविध भाषांच्या वापराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी तत्सम विद्यापीठांकडून असे आणखी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

Image

तेलुगू विद्यापीठाच्या स्थापना दिन सोहळ्याला संबोधित करताना, उपराष्ट्रपतींनी विविध संशोधन उपक्रमांद्वारे तेलुगू भाषा, साहित्य आणि इतिहास जतन करण्याच्या विद्यापीठाच्या वचनबद्धतेचे कौतुक केले. त्यांनी विद्यापीठ स्थापनेसाठी पुढाकार घेणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री एन.टी. रामाराव यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी तेलंगणा राज्य सरकार आणि मुख्यमंत्री श्री के. चंद्रशेखर राव यांनी विद्यापीठाचा विकास करण्यासाठी आणि तेलुगू भाषा आणि संस्कृतीला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

जागतिकीकरणाचा व्यापक परिणाम लक्षात घेऊन, तरुणांनी त्यांच्या सांस्कृतिक वारसा न गमावण्याची काळजी घेतली पाहिजे यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला. आपली ओळख निर्माण करण्यासाठी आणि तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन श्री नायडू म्हणाले की, लोकांनी त्यांच्या मातृभाषेत बोलण्याचा अभिमान बाळगला पाहिजे.

भारतीय भाषांना चालना देऊन मुलांना त्यांच्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यास प्रोत्साहन देण्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 चे उद्दिष्ट आहे असे निरीक्षण श्री. नायडू यांनी नोंदवले. ते म्हणाले कि उच्च शिक्षणापर्यंत आणि तांत्रिक अभ्यासक्रमांसाठीही शिक्षणाचे माध्यम मातृभाषेतूनच असले पाहिजे.

या संदर्भात श्री नायडू यांनी विद्यापीठांना भाषांमध्ये प्रगत संशोधन करण्याचे आणि भारतीय भाषांमधील वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली सुधारण्याचे आवाहन केले जेणेकरून त्यांचा शैक्षणिक क्षेत्रात व्यापक पोहोच आणि वापर सुलभ होईल.

यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते कवी आणि समीक्षक डॉ. कुरेल्ला विठ्ठलाचार्य आणि कुचीपुडी नृत्याचे प्रवर्तक श्री कलाकृष्ण यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नंतर श्री नायडू यांनी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या विद्यापीठातील छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले. अभ्यागत पुस्तकात लिहिताना, उपराष्ट्रपतींनी तेलंगणा आणि हरियाणा या राज्यांदरम्यानची सांस्कृतिक देवाणघेवाण लोंकांसमोर मांडण्यासाठी आयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. अधिकाधिक लोकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा या उद्देशाने त्यांनी लिहिले की असे उपक्रम या राज्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी आणि लोकांमधील परस्पर संपर्काला प्रोत्साहन देण्यासाठी खूप मदत करतील.

तेलंगणा राज्याचे गृहमंत्री, श्री मोहम्मद महमूद अली, उपाध्यक्ष, तेलंगणा राज्य नियोजन मंडळ, श्री बी. विनोद कुमार, तेलुगू विद्यापीठाचे कुलगुरू, श्री थांगेडा किशन राव, कुलसचिव, श्री भट्टू रमेश, विद्यार्थी, कर्मचारी आणि अन्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.