तिरंगा रॅलीवेळी कलम 144 लावले , राहुल गांधी मुंबईत येणार तेव्हा जमावबंदी लावणार का? : असदुद्दीन ओवेसी

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचं मन केवळ मराठ्यांसाठी धडधडणार का?-ओवेसी

Image

मुंबई,११ डिसेंबर /प्रतिनिधी:- असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीत राहुल गांधी, राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मोदी सरकारवर सडकून टीका केलीय.एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची आज सकाळी औरंगाबाद येथून निघालेली तिरंगा रॅली संध्याकाळी मुंबईत दाखल झाली. या रॅलीदरम्यान पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. पण अखेर एमआयएमची मुंबईत चांदिवली येथे रॅली पोहोचली. तिथे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची भव्य सभा झाली. या सभेत भाषण करताना ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाची मागणी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

Image

“मुस्लीम आरक्षणासाठी आजची रॅली आयोजित करण्यात आली आहे. तिरंगा रॅली काढली म्हणून शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारला काय त्रास झाला की त्यांनी जागोजागी ही रॅली अडविण्याचा प्रयत्न केला. मला या गोष्टीची खंत वाटतेय. शिवसेना 24 तासात राष्ट्रवाद म्हणून दोन हजारवेळा घोषणा करते तीच शिवसेना तिरंगा हाच आपला राष्ट्रवाद आहे हे कसं विसरते? तिरंगाच आपल्या देशाची ओळख आहे. या तिरंग्याचा इतका का देश वाटतो? तुम्हाला मुसलमानांचा द्वेश असू शकतो, पण तिरंगा उचलल्यावर द्वेश वाटतो. तिरंगा भारताची ओळख, आमच्या प्रेमाची निशाणी आहे, तसेत आमच्या पूर्वजांच्या आहुतींचा सन्मान आहे”, असं ओवेसी म्हणाले.

 एमआयएमच्या सभेला परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी राहुल गांधी यांची सभा असेल तर काही नाही, पण आम्ही आलो तर कलम १४४ लावला जातो, असा आरोप केला. तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचं मन केवळ मराठ्यांसाठी धडधडतंय का? असा सवालही केला. ते मुंबईतील तिरंगा रॅलीच्या सभेत बोलत होते.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “राहुल गांधी सभेसाठी येणार असतील तर काही नाही, पण आम्ही आलो तर लगेच कलम १४४ लावला जातो. किती कलम १४४ लावाल? बीएमसीची निवडणूक देखील रोखाल का? महाराष्ट्राच्या निवडणुका देखील बंद करणार का? ओमायक्रॉन विषाणू येतो आहे असं म्हणता, मग मुंबईत किती जिनोम सिक्वेंसिंग झालंय हे सांगा. संपूर्ण भारतात १ टक्के देखील जिनोम सिक्वेंसिंग झालेलं नाही. मुंबईत ४५ वर्षांवरील किती नागरिकांना लसीचे दोन डोस मिळाले हे सांगा. जे डॉक्टर, नर्सेस यांना दोन डोस घेऊन ७ महिने झालेत, त्यांना बुस्टर डोस दिला पाहिजे. मात्र, मोदींना, उद्धव ठाकरे यांना त्याची काळजी नाही.”

जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाव न घेता निशाणा

“मुस्लीम आरक्षणाच्या नावावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक वक्तव्य केले होते. मुंब्राचे आमदार तर म्हणाले की, आमच्या तोंडाचं जेवण उचललं. त्यानंतर आमच्या महाराष्ट्राचा निर्मळ मुसलमान खूश झाला. ते आमचं जेवण परत करण्याबद्दल बोलत आहेत. त्यासाठी आम्ही उपाशी राहून त्यांना मतदान केलं. पण जेव्हा जिंकून आले तेव्हा त्यांना मुसलमान दिसत नाहीत. आता टेबलवर तीन लोक दाबून खात आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे कोण आहेत ते माहिती नाही. यांना जेवण देण्यासाठी तुम्ही उपाशी राहिलात. आपल्या मुलांबाळांचा विचार नाही केलात. आता बघा बसून कोण दाबून खात आहे”, असा घणाघात ओवेसी यांनी केला.

बुस्टर डोससाठी एम-आरएनएच्या फायझर किंवा मॉडर्ना लसीच हव्यात

“तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे बुस्टर डोस हा कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचा असू शकत नाही. बुस्टर डोससाठी एम-आरएनएच्या (M-RNA) केवळ फायझर किंवा मॉडर्ना लसीच असतील. असं असताना मोदी देश चालवत आहेत, पण फायझर आणि मॉडर्नासोबत भांडण सुरू आहे. करोनाची तिसरी लाट येऊ नये असंच आम्हाला ही वाटतं, पण बुस्टर डोस लावणं सरकारचं काम आहे. मी तर मुस्लिमांमध्ये बुस्टर डोस लावूनच थांबणार आहे,” असं असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितलं.

“शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचं मन केवळ मराठ्यांसाठी धडधडणार का?”

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “प्राथमिक शाळेत २३ टक्के मुस्लीम मुली आहेत, माध्यमिक शाळेत येईपर्यंत ही संख्या १२ टक्के होते. दहावीपर्यंत ११ टक्के, उच्च माध्यमिकपर्यंत ६ टक्के असं प्रमाण खाली जात आहे. असं असतानाही कुणीच आरक्षणाविषयी बोलणार नाही. ही माझी आकडेवारी नाही, तर महाराष्ट्र सरकारची आकडेवारी आहे. महाराष्ट्रात ८३ टक्के मुस्लिमांकडे जमीन नाही. ते भूमिहीन आहेत. दुसरीकडे केवळ १ टक्के मराठ्यांकडे जमीन नाही. १ टक्के आणि ८३ टक्के यात सांगा कोणता न्याय आहे?”

महाराष्ट्रात केवळ  4.9 टक्के मुस्लीम सुशिक्षित

“मुंबई हायकोर्टाने सांगितलंय की, महाराष्ट्रात मुसलमानांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. कारण ते सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत. पण हे महाविकास आघाडी सरकार ते विसरलं. ते मराठा आरक्षणाची गोष्ट करतात. महाराष्ट्रात किती मुस्लिम पदवीपर्यंतचं शिक्षण घेतात? 30 टक्के देखील नाहीत. महाराष्ट्रात फक्त 4.9 टक्के मुस्लीम सुशिक्षित आहेत. 25 टक्के मुसलमान वर्षाला 25200 कमवतात. 3 लाख 60 हजार वर्षाला कमाई करणारे शून्य टक्के आहेत. मराठ्यांची वार्षिक कमाई आकडेवारी मात्र वेगळी आहे. कमाईमध्ये मराठ्यांची कमाई खूप जास्त आहे. मराठा IAS अधिकारी अनेक, मुसलमान एकही नाही. मंत्रालयात मराठा 28 टक्के आहेत. मराठा आणि मुसलमान समाजात मोठी तफावत आहे. तरीही मराठ्यांना आरक्षण आणि मुसलमान मात्र वंचित”, अशी भूमिका त्यांनी मांडली.