राज्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने ओलांडला एक लाखाचा टप्पा

मलेरिया, डेंग्यूला आळा घालण्यासाठी कीटकनाशक फवारणीचे काम हाती घ्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे
आज एकाच दिवशी ८ हजार १८ रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि.२: राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८ हजार १८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. आज सर्वाधिक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळातील असून ७ हजार ३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज सोडण्यात आलेल्या ८ हजार १८ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ७ हजार ३३ (आतापर्यंत एकूण ७२ हजार २८५) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४७७ (आतापर्यंत एकूण १४ हजार ३१५), नाशिक मंडळात ३३२ (आतापर्यंत एकूण ५६०२), औरंगाबाद मंडळ ९३ (आतापर्यंत एकूण ३२१४), कोल्हापूर मंडळ १२ (आतापर्यंत एकूण १५५६), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ७०२), अकोला मंडळ ३१ (आतापर्यंत एकूण १९६४), नागपूर मंडळ ३३ (आतापर्यंत एकूण १५३४) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

दि. २९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा तेवढ्याच विक्रमी संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून दि. १५ जून रोजी एकाच दिवशी ५ हजार ७१, दि.२४ जून रोजी ४ हजार १६१ आणि दि. २५ जून रोजी ३ हजार ६६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जूनमध्ये एकाच महिन्यात १२ हजार ८९३ एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले.

गेल्या काही महिन्यापासून सातत्याने राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५१ ते ५३ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टिव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *