ईडीच्या कार्यालयातून पत्रकारांना बातम्या पेरण्यात येत आहेत-नवाब मलिक

मुंबई,११ डिसेंबर /प्रतिनिधी:-ईडीच्या कार्यालयातून पत्रकारांना काही दिवसांपासूनबातम्या पेरण्यात येत आहेत की, नवाब मलिक यांच्या घरावर छापा पडणार आहे. माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी बातम्या पेरून बदनामीचा उद्योग करण्याऐवजी सरळ प्रेस नोट काढावी आणि जबाबदारी स्वीकारावी. भाजपच्या अजेंड्यावर आम्हाला बदनाम करण्याचा उद्योग ईडीने बंद करायला हवा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली.

किरीट सोमय्या सांगत आहेत की नवाब मलिकना अटक होणार आहे. त्यांनी ईडीचे प्रवक्ते झाल्याचे अपॉईंटमेंट लेटर घ्यावे. ईडीलाही एका प्रवक्त्याची गरज आहे. काही खासदारांनी सत्तेत असताना बोगस बिलांद्वारे पैसे उकळले, त्याचीही माहिती मी येणाऱ्या काळात बाहेर काढणार आहे. किरीट सोमय्यांना ईडीचा प्रवक्ता घोषित केले पाहीजे. मी दररोज सकाळी पुष्पगुच्छ घेऊन ईडीच्या अधिकाऱ्यांची वाट पाहत असतो. यापुढेही आले तर त्यांचे स्वागतच करु, असे मलिक म्हणाले. ईडीला जी काही कारवाई करायची असेल ती त्यांनी करावी. मात्र बातमी पेरण्याचे उद्योग बंद करावेत. वक्फ बोर्डाबाबत कोणती केस नोंदविण्यात आली? त्यात काय प्रगती झाली? त्यात कोण आरोपी होऊ शकतात? याची रितसर माहिती द्या, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

मी वक्फ बोर्डाची जमीन हडप केलेली नाही. मात्र आगामी काळात वक्फची जमीन हडप केलेल्या दोन भाजपच्या नेत्यांवर एफआयआर दाखल होणार आहे. त्यांना लवकरच अटक होईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.