गुप्त धन काढून देतो म्हणणाऱ्या भोंदूबाबाला अटक

कापड व्यापाऱ्याला नऊ लाखांचा  गंडा

औरंगाबाद,११ डिसेंबर /प्रतिनिधी:- घरावर सापांचा साया असून गुप्त धन काढून देतो, मात्र हा प्रकार कोणाला सांगितल्यास कोंबडा बनवून  टाकु अशी धमकी देत कापड  व्यापाऱ्याला तब्बल नऊ लाखांना गंडा घातल्या प्रकरणी छावणी पोलिसांनी शनिवारी दि.११ पहाटे आरोपींपैकी एकाच्‍या मुसक्या आवळल्या. आसिफ अब्दुल जब्बार कुरेशी (३२, रा. मिरगन गल्ली, ता. मानवत जि. परभणी) असे आरोपी भोंदूबाबाचे नाव आहे. आरोपीला १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.यू. न्‍याहारकर यांनी दिले.

या प्रकरणात शेख रफत शेख करीम (३४, रा. गवळीपुरा छावणी) यांनी फिर्याद दिली. शेख रफत हे कापडाचे   व्यापारी आहेत. रफत आणि त्यांच्या पत्नीचे सतत भांडण होत असल्याने घरात अशांतता होती. परभणीच्या एका मित्राने त्‍यांना मानवत येथील सायलू महाराजांची भेट घेण्याचा सल्ला दिला. जून २०२१ मध्ये रफत, त्यांची पत्नी आणि मित्र हे मानवला गेले. परंतु सायलू महाराज ऐवजी त्‍यांना सीताराम महाराज भेटला. सीतारामने तुमच्यावर करणी केली आहे, असे सांगत औरंगाबाद येथे येऊन पाहणी करण्यासाठी ९६ हजार रुपयांची मागणी केली. त्‍यानूसार रफत यांनी पैसे दिले. त्यानंतर सीताराम महाराज, शंकर महाराज आणि इतर औरंगाबादमध्ये आले. घरावर सापाचा साया आहे, घरात ९६ किलो गुप्त धन आहे ते काढून देण्यासाठी पुजा करावी लागेल असे म्हणाले. त्यांनी वेळोवेठी रफत यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने असे तब्बल ९ लाख ९५ हजार २०० रुपये उकळले. परंतु रफत यांच्या घरातून कोणतेही गुप्तधन निघाले नाही. त्यांनी सीताराम महाराज यांची परभणी येथे जाऊन भेट घेतली आणि पैसे परत करण्याची मागणी केली. त्यावेळी माझ्याकडे अघोरी विद्या असून याची कोठेही वाच्यता केली तर कोंबडा बनविण्यात येईल, अशी धमकी दिली. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील नीता  किर्तीकर यांनी आरोपीच्‍या साथीदारांना अटक करायची आहे. गुन्‍ह्यातील मुद्देमाल जप्‍त करायचा आहे. तसेच आरोपीने हा गुन्‍हा कोणाच्‍या सांगण्‍यावरुन केला याचा देखील तपास करायचा बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली