गमावलेल्या वीरांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण राष्ट्र उभे-पंतप्रधान नरेंद्र मोदी

जनरल बिपिन रावत यांचे निधन हे प्रत्येक भारतीयाचे, प्रत्येक देशभक्ताचे मोठे नुकसान-पंतप्रधान

उत्तर प्रदेशमधल्या बलरामपूर येथे शरयू कालवा  राष्ट्रीय प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

Image

बलरामपूर​(उत्तर प्रदेश)​,११ डिसेंबर /प्रतिनिधी:-पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशमधल्या  बलरामपूर, येथे शरयू कालवा राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत उपस्थित होते.

यावेळी सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी भारताचे पहिले सीडीएस अर्थात संरक्षणदल प्रमुख जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचा अकाली मृत्यू प्रत्येक भारतीयासाठी, प्रत्येक देशभक्तासाठी मोठे नुकसान असल्याच्या भावना व्यक्त केल्या.  ते म्हणाले, “देशाची सुरक्षा दले  स्वावलंबी करण्यासाठी  जनरल बिपिन रावत करत असलेल्या कठोर परिश्रमांचा  संपूर्ण देश साक्षीदार आहे.”भारत दु:खात असला तरी ‘दु:ख सोसत असताना  आम्ही आमची गती थांबवत नाही आणि प्रगतीही थांबवत नाही. भारत थांबणार नाही. देशाच्या सशस्त्र दलांना स्वावलंबी करण्याची मोहीम, तिन्ही सैन्यदलांमधील समन्वय मजबूत करण्यासाठी मोहीम, पुढे सुरूच राहील. जनरल बिपिन रावत, येत्या काही दिवसांत त्यांचा भारत नव्या संकल्पांसह पुढे जाताना पाहतील, अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देशाच्या सरहद्दींची सुरक्षा अधिक वृद्धिंगत करण्याचे  काम, सीमेवरील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम सुरूच राहील,’ असे ते म्हणाले. उत्तर प्रदेशच्या देवरिया इथले रहिवासी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर अथक परिश्रम घेत आहेत. “ त्यांचे प्राण वाचवण्यासाठी देवी  पाटेश्वरीकडे प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.संपूर्ण देश वरुण सिंग यांच्या कुटुंबासोबत आणि  गमावलेल्या वीरांच्या कुटुंबियांसोबत उभा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

देशातील नद्यांच्या पाण्याचा योग्य वापर आणि शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पुरेसे पाणी पोहोचणे हे सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.  शरयू  कालवा राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण होणे, हा  विचार प्रामाणिक असेल तर कामही ठोस होते,याचा पुरावा असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

Image

प्रकल्पाचे काम जेव्हा  सुरू झाले तेव्हा त्याचा खर्च  100 कोटी रुपयांपेक्षा कमी होता. आज सुमारे 10 हजार कोटी रुपये खर्च करून हे काम पूर्ण झाले आहे,  असे पंतप्रधान म्हणाले.

“यापूर्वीच्या सरकारांच्या निष्काळजी पणाची देशाने 100 पट अधिक किंमत मोजली आहे. “हा सरकारचा पैसा आहे, मग मी कशाला काळजी करू? ही अशी विचारसरणी देशाच्या समतोल आणि सर्वांगीण विकासात सर्वात मोठा अडथळा बनली होती. या विचारसरणीमुळे शरयू कालवा प्रकल्पही रखडला. ” असं पंतप्रधान यावेळी  म्हणाले, ‘शरयू कालव्याच्या प्रकल्पात जेवढे काम 5 दशकांमध्ये  झाले, त्यापेक्षा जास्त काम आम्ही 5 वर्षांत केले आहे. हे दुहेरी इंजिनचे  सरकार आहे. हा दुहेरी इंजिन सरकारच्या कामाचा वेग आहे, प्रकल्प वेळेत पूर्ण करणे याला आमचे प्राधान्य आहे.

दुहेरी इंजिनाच्या सरकारांनी मिळून पूर्ण केलेल्या बाण सागर प्रकल्प, अर्जुन सहाय्यक सिंचन प्रकल्प, गोरखपूर येथील एम्स आणि  खत प्रकल्प यासारख्या प्रलंबित प्रकल्पांची यादी पंतप्रधानांनी यावेळी सांगितली.  या सरकारच्या वचनबद्धतेचे उदाहरण म्हणून त्यांनी केन-बेतवा नदी जोड  प्रकल्पाचाही उल्लेख केला. 45000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बुंदेलखंड प्रदेशाला पाण्याच्या समस्येतून बाहेर काढण्यात  हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल. छोट्या  शेतकऱ्यांना प्रथमच सरकारी योजनांशी जोडले जात असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. पीएम किसान सन्मान निधी, मत्स्यपालन आणि दुग्धव्यवसाय आणि मधमाशी संवर्धनातील पर्यायी उत्पन्न स्रोत आणि इथेनॉलमधील संधी यासारखे उपाय केले  जात आहेत. गेल्या साडेचार वर्षांत उत्तर प्रदेशातूनच 12000 कोटी रुपयांचे इथेनॉल खरेदी करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या नैसर्गिक शेती आणि शून्य बजेट शेती या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना आमंत्रित केले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यातील 30 लाखांहून अधिक कुटुंबांना पक्की घरे मिळाली असून, त्यापैकी बहुतांश घरे कुटुंबातील महिलांच्या नावावर असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यांनी स्वामित्व योजनेच्या फायद्यांविषयीही सांगितले.

या कोरोना काळात कोणीही गरीब व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत अन्नधान्य वितरित करण्याच्या योजनेला होळीनंतरही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

पूर्वीच्या काळात माफियांना संरक्षण मिळत असे, आज माफियांना तुरुंगात टाकले जात आहे आणि तो फरक स्पष्ट दिसत  आहे, असे  पंतप्रधान म्हणाले . यापूर्वी सशक्त लोकांनाच प्रोत्साहन दिले जात होते . आज योगीजींचे सरकार गरीब, दलित, मागास आणि आदिवासींचे सक्षमीकरण करण्यासाठी काम करत आहे . म्हणूनच उत्तर प्रदेशचे  लोक म्हणतात – फरक दिसत आहे. पूर्वी जमिनी हडप करणे हा  माफियांचा  अवैध धंदा होता तर आज योगीजी अशा अतिक्रमणांवर बुलडोझर चालवत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशचे लोक म्हणतात – फरक दिसत आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.