वैजापूर शहरात बुधवारपासून प्रभागनिहाय घरोघरी जाऊन लसीकरण ; अकरा प्रभागात पथके नियुक्त

वैजापूर ,७ डिसेंबर /प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वैजापूर नगर पालिकेच्यावतीने शहरात बुधवार (ता.8) पासून प्रभागनिहाय घरोघरी जाऊन कुटुंबनिहाय लसीकरण तपासणी आणि पहिला व दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.अशी माहिती मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांनी दिली.
नगरपालिका व उपजिल्हा रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने शहरातील अकरा प्रभागात 8 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे यासाठी प्रत्येक प्रभागात पथक नियुक्त करण्यात आले आहे.नगरपालिकेचे शिक्षणाधिकारी मनीष गणवीर यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात येणार असून प्रभाग क्र.1 ते 4 साठी एच.आर.शेख, प्रभाग क्र.5 ते 8 साठी आर.डी.वसावे व प्रभाग क्र.9 ते 11 साठी जी.जी.राजपूत यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बी.एस.मोरे, एस.बी.नामेवर, एस.एस.कुमावत, आर.आर.घुसळे, एस.एम.दुधमल, एस.पी. शेलार, आर.के.सोमासे, जे.सी. पाटील, बी.बी.जाधव, व्ही.आर.तगरे व एस.के.शेळके यांना पथकप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. शहरातील ज्या नागरिकांनी अद्याप कोविड-19 ची लस घेतली नाही त्यांनी लसीकरण करून घ्यावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान व पालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांनी केले आहे.