मराठीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिकांनी झटत राहावे – खासदार शरद पवार

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा झाला समारोप

नाशिक,५ डिसेंबर /प्रतिनिधी:- स्वाभिमानाचा वारसा सांगणाऱ्या मराठी भाषेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिकांनी झटत राहावे, त्यासाठी त्यांना राज्यकर्त्यांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे प्रतिपादन ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खासदार शरद पवार यांनी केले.

आज भुजबळ नॉलेज सिटीच्या कुसुमाग्रज नगरीत 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप खासदार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, प्रमुख अतिथी म्हणून माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार हेमंत गोडसेआमदार डॉ. सुधीर तांबे, माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोऱ्हे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, मुख्य निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख कार्यवाह हेमंत टकले, संजय करंजकर, शंकर बोऱ्हाडे, विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते.

यावेळी स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी प्रमुख अतिथी शरद पवार, माजी न्या. नरेंद्र चपळगावकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोऱ्हे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे आदींचे स्वागत केले. माजी आमदार हेमंत टकले यांनी सूत्रसंचालन केले. तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पाठविलेला शुभेच्छा संदेशाचे वाचन केले.

पुढे बोलताना खासदार श्री. पवार म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडते आहे का याचे सिंहावलोकन करण्याची वेळ आता आली आहे. राज्य स्थापनेपासून आपण भाषा जतनासाठी काय केले. आपली भाषा नेमकी कुठे याचा लेखाजोखा मांडला जावा. यासाठी राज्य शासनाने पुन्हा कार्यक्रम हाती घ्यायला हवा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मातृभाषेचा गौरव करताना स्वतःची राजमुद्रा पारसी भाषेत न लिहिता संस्कृतमध्ये लिहिली. तसेच राज्यव्यवहारातील शब्दांचे मराठीकरण करायचे ही महाराजांची कल्पना किती मोठी होती हे लक्षात घेणे आवश्यक आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महादेव गोविंद रानडे, आगरकर, डॉ. आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या अनेकांनी स्वातंत्र संग्रामात मराठी साहित्याची सेवा केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी केलेलं कार्य खूप महनीय आहे. सावरकरांची अवहेलना नाशिककर करूच शकत नाही. संमेलन स्थळाला साहित्यिक वि वा शिरवाडकर यांचं नाव दिले ते उत्तम झाले. लोकहितवादी मंडळ 70 वर्षे काम करते आहे साहित्याचा पुरस्कार करत आहेत. तात्यासाहेबांचे नाव दिल्याने संमेलनाची उंची वाढविण्याचे काम केले. सरकारतर्फे तात्यासाहेबांना ज्ञानपीठ दिला माझं मोठं भाग्य होतं की त्यावेळी राज्याचा प्रतिनिधी म्हणून मी तिथे उपस्थित होतो, अशी आठवणही त्यांनी दिली. मराठीसाठी अतोनात प्रयत्न केलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल बोलताना आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. त्यांनी आपल्या भाषेतून केवळ साहित्यिक विकास होऊ नये तर वैज्ञानिक विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांनी राज्यात स्वतंत्र भाषा संचालनालय स्थापन केले. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश मंडळ स्थापन केले. मराठी भाषा स्थानिक बोलीभाषांच्या बाबतीत समावेशक झाली तरच ती अधिक समृद्ध होईल असेही ते म्हणाले. पदवी व पदवीनंतरचे शिक्षण मराठी भाषेतून देण्याचा विचार होणे आवश्यक असल्याचे सांगून समाजमाध्यमांचा वापर वाढल्याने सोशल मीडियावरून माणसं व्यक्त होवू लागल्याने नवसाहित्यात मराठीचा प्रसार होण्यासाठी आश्वासक प्रयत्न होऊन मराठी भाषा संगणक व समाजमाध्यमातून झळकायला हवी. मराठी भाषा ही मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी प्रमुख अतिथी माजी न्या. चपळगावकर म्हणाले की, आपली मातृभाषा आपण बोललो तरच ती वाढेल. याकरिता आपण सर्वानी आग्रह धरणे आवश्यक असून याकरीता मराठी शाळांना आवश्यक साधनसामुग्री द्यावी. यासाठी शासनाबरोबर पालकांचाही पाठिंबा आवश्यक आहेत. पालकांनी आपला पाल्य ज्या शाळेत जातो. त्या शाळेसाठी आपलीही जबाबदारी ओळखली पाहिजेत. असे सांगून राज्य घटनेने आपल्याला जे स्वातंत्र्य दिले आहेत ते अबाधित ठेवून आपले शिक्षण, राज्य कारभार मराठीत झाला पाहिजेत. कायद्याची पुस्तके मराठीत आली आहेत. आपल्या व्यवहाराची भाषाही मराठी असावी. याबाबत त्यांनी इतर राज्यांची उदाहरणे दिलीत. त्याचबरोबर स्वातंत्र्याचा हुंकार आपल्या नाशिकने दिल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच लेखकाला लिखाणाचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजेत असे सांगून ते म्हणाले की, राजसत्ता आणि जनता यांच्यात एक तिसरीशक्ती आहे. या तिस-या शक्तीमुळे व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहते. याला कोणी रोखण्याचा प्रयत्न केल्यास लोकशाही धोक्यात येईल असेही ते म्हणाले.

यावेळी प्रमुख पाहुणे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, साहित्यिकांनी आपल्या लिखाणातून स्वातंत्र्य भारताच्या चळवळीची ज्योत पेटविली आहे. संतांच्या आणि चळवळीच्या परंपरा राज्य घटनेत उतरल्या आहेत. संत साहित्याने नेहमीच लोकशाहीचा पाया मांडला. जगाच्या पातळीवर कट्टरवाद वाढत असताना त्यांनी कट्टरवादावर कठोर लिखाण केले आहेत. नाशिकच्या मातीला साहित्याचा इतिहास आहे. समतेचा संदेश संत निवृत्तीनाथांनी या भूमीतून दिला आहे. संतांची पंरपरा पुढे नेण्याची ताकद नाशिकच्या मातीत आणि गोदावरीच्या पाण्यात असून राजकारणी जिथे कमी पडतील तीथे लेखक, कवी यांनी पुढे येऊन देशाला पुढे नेले पाहिजे असे आवाहन करून या संमेलनाची साहित्य संमेलनात यशस्वी व सुंदर संमेलन म्हणून नोंद होईल असा विश्वास व्यक्त केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे आदर्शच त्यांचा संमेलनालात यथोचित सन्मान – छगन भुजबळ

यावेळी पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की, सभामंडपाला कुसुमाग्रज नगरी नाव देण्याचे अगोदरच ठरले होते. मग त्यांच्या नावाला विरोध व्हायला नको. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी आदर्श आहे. संमेलनात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला असूनही टीका होणे उचित नाही.  हे संमेलन अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केला. हा उत्सव संपल्यावर आपल्याला गणेशोत्सवाप्रमाणे चुकल्या चुकल्यासारखे वाटणार आहे. नाशिकला येत चला नाशिकला पुन्हा संमेलन होऊद्या अशी गळ साहित्य मंडळाला घातली. तसेच समतेची ही संस्था आपल्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. आपण परत परत नाशिकला या असे आवाहनही त्यांनी साहित्यिकांना केले. कोरोनामुळे संमेलनासाठी उशीर झाला. संमेलन घेणे आवश्यक असल्याने महिन्यांपूर्वी संमेलन घेणे हे ठरलं आणि रात्रंदिवस तयारी केली. यासाठी सर्वांचे हातभार लागला. यामध्ये साफसफाई कामगारांच्या विशेष योगदानाबद्दल आभार. तसेच भोजन व्यवस्था, डॉक्टर, सजावट, चित्रकार, शिल्पकार, रांगोळीकर, फुलांची सजावट, जिल्हापरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, महापौर ,पोलीस यंत्रणा, अग्निशामक यंत्रणा, निधी दिलेले सर्व आमदार, महाराष्ट्र शासन, सर्व देणगीदार, बालकवी, गझलकार, साहित्यिक, मराठी साहित्य मंडळ, लोकहितवादी मंडळ, मेट भुजबळ नॉलेज सिटी, मराठी भाषा विभाग सर्व पाहुणे, प्रेक्षक, माध्यमे सर्वानी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.यावेळी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनीही आपले विचार मांडले.