मराठवाड्यातील तालुकास्तरावरील सर्व रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सेवा-सुविधा देणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे

परभणी,५ डिसेंबर /प्रतिनिधी:-  जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सर्व समस्या सोडवण्यात येतील तसेच येणाऱ्या काळात परभणी जिल्ह्याला प्राधान्य देवून सर्व सुविधा देण्यात येतील. सामान्य माणसाला शुन्य शुल्कात  अत्याधुनिक आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून आरोग्य सुविधांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे होते तरी कोरोनाने माणसाला जीवनाचे महत्व कळाले आहे. नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन हा तेवढा घातक  नसून यामध्ये कोव्हिड-19च्या नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे झाले आहे. मराठवाड्यातील डॉक्टरांची सर्व पदे भरण्यात आली असून येत्या काही महिन्यात मराठवाड्यातील सर्व तालुकास्तरावरील रुग्णालयात रुग्णांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले.

परभणी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या शुभांरभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार मेघना बोर्डीकर, जि.प.उपाध्यक्ष अजय चौधरी, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, प्रताप देशमुख, डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, डॉ. परमेश्वर जाधव व डॉ.शितल जाधव,  महापालिका आयुक्त देविदास पवार आदींची उपस्थिती होती.

आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले की,  काही महिन्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णांना उत्तमोत्तम सुविधा मिळणार  असून सोनोग्राफी, एमआरआय आणि सिटीस्कॅनची सुविधा येणाऱ्या सहा महिन्यात तालुक्यातील रुग्णालयात उपलब्ध करुन दिली जाईल. तसेच  परभणीत ईएसआयएसचे हॉस्पिटल आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून मेडिकल कॉलेजसाठी औपचारिक ती सर्व प्रक्रिया झाली असून लवकरच मंत्रीमंडळ बैठकीच्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.  सामान्य नागरिकांना शुन्य शुल्कात उपचार मिळावेत यासाठी राज्यस्तरावर योजनेची आखणी केली जात असून यातून आरोग्याच्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. आरोग्य विभागाने कात टाकली असून नव्या दमाने सेवा नागरिकांना दिली जाईल. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज झाल्यास मराठवाडा आरोग्या सुविधाच्या दृष्टीने स्वावलंबी होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. परभणी जिल्ह्यात लसीकरणाला गती मिळणे गरजेचे असून लस ही कवचकुंडल असल्याने आरोग्य विभागासह ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते नगरसेवकांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून आपापल्या क्षेत्रातील व्यक्तींचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घ्यावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी माजी खासदार सुरेश जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आमदार सुरेश वरपुडकर व खासदार संजय जाधव यांची यावेळी समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास रुग्णालयातील डॉक्टर्स, नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर कॅथलॅब व कार्डियाक डायग्नोस्टिक सेंटरचे दीपप्रज्वलन  करुन व  फित कापुन उदघाटन केले. तर वसमत रोडवरील डायग्नोस्टिक सेंटर व परभणी मेडिकल व सर्जिकलच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून तेथील उपकरणांची माहिती जाणून घेत रुग्णांना चांगल्या सुविधा द्याव्यात. अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी मान्यवर आणि नागरिकांची उपस्थिती  होती.