विराज जोशी,श्रीनिवास जोशी,सचिन नेवपूरकर यांचे गायन रंगले

औरंगाबाद,२ डिसेंबर /प्रतिनिधी:- भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ध्यास परफॉर्मिंग आर्टस् तर्फे “नमन भास्करा” या शास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन पं जसराज सभागृहात करण्यात आले. या मैफिलीत पं भीमसेन जोशींचे नातु विराज जोशी , सुपुत्र श्रीनिवास जोशी, ध्यासचे संचालक सचिन नेवपूरकर यांचे गायन रंगले.

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-12-02-at-7.52.06-PM-1024x564.jpeg

सुरुवातीला विराज जोशी यांनी राग मारवा गायला. ‘अणूरनिया ठोकडा ‘ या अभंगाने त्यांनी आपले सादरीकरण पुर्ण केले. कमी वयातही उत्तम सादरीकरणाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-12-02-at-7.51.17-PM-1024x562.jpeg

मैफिलीच्या दुसऱ्या सत्रात ध्यास चे संचालक सचिन नेवपूरकर यांनी मंचाचा ताबा घेतला. राग भूप मधील तिलवाडा तालातील ‘जब मै जानी’ हा पारंपारिक बडाख्याल, ‘तुम हम संग’ ही मध्यलय तीनतालातील पारंपारिक बंदिश तर ‘न जानू मोरी ‘ही स्वरचित बंदिश द्रुत तीनतालात सादर केली. राग रागेश्री मधील मध्यलय झपतालात ” आलीरी जियरा मोरा” ही स्वरचित रचना व नंतर पं नाथ नेरळकर गुरुजींनी संगीतबद्ध केलेला अभंग ‘ अवघा रंग एक झाला ‘ याने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. आपल्या एकूण सादरीकरणात मेवाती आणि आग्रा – ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा प्रभाव सचिनजींच्या सादरीकरणात दिसुन आला. विविध सरगम आणि लयकारींनी त्यांनी मैफिलीला एका उंचीवर नेले.

यानंतर पंडितजींचे सुपुत्र आणि जेष्ठ शास्त्रीय गायक श्री श्रीनिवास जोशी यांचे गायन रंगले. सुरुवातीला राग बिहाग मध्ये बडाख़याल तसेच ‘लट उलझी’ ही प्रसिद्ध बंदिश सादर केली. त्यांनी गायनाचा समारोप ‘रस के भरे तोरे नैना’ या भैरवीने केला. पंडितजींच्या गाण्याचा प्रभाव असूनही श्रीनिवास जींनी स्वतःच्या गायन शैलीने प्रेक्षकांवर प्रभाव टाकला.

या कार्यक्रमाला ओंकार कुलकर्णी, सुधांशु परळीकर यांनी तबला तसेच यश खडके यांनी हार्मोनियमची समर्पक साथ केली. श्री सुधीर मोघे यांनी नेहमीच्या शैलीत मैफिलीचे उत्तम सूत्र संचालन केले. या मैफीलीला गुरू शुभदाताई पराडकर, अविनाश बहिरगावकर, दिलीप दोडके, गजानन केचे, रामलिंग लिंगाडे, सुजीत नेवपूरकर,मिलिंद गोसावी,महेश अचिंतलवार, चंदल अडगावकर, शरद भोकरे , जयंत नेरळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कोविड चे नियम पाळुन सुज्ञ रसिक प्रेक्षकांच्या उपस्थित मध्ये ही मैफिल उत्तमरीत्या संपन्न झाली.