नव्या ऑमिक्रॉन विषाणूची फारशी भीती बाळगू नका-पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने

जीवनसाधना गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले व बाळासाहेब जाधव यांना प्रदान 


नांदेड,१ डिसेंबर /प्रतिनिधी:-
शिक्षणातून माणूस स्वयंपूर्ण झाला पाहिजे, पण आपण शिक्षण घेतांना आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा अभ्यास करावा. आपल्या परिसरासाठी कोणत्या ज्ञानाची आवश्यकता आहे हे पहावे. तसे शिक्षण घ्यावे, त्या ज्ञानाचा समाज विकासासाठी उपयोग करावा, असे आवाहन सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.नव्या ऑमिक्रॉन विषाणूची फारशी भीती बाळगू नका. २६ नोव्हेंबर रोजी तो आढळला आहे. त्याचे पूर्ण रूप कळण्यास चार  आठवड्याचा कालावधी लागेल. दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या फैलाव पाहता हा झपाट्याने पसरणारा आहे. जो विषाणू झपाट्याने पसरतो तो फारसा धोकादायक नसतो. त्यामुळे याचा भारतात फैलाव झालाच तर हॉस्पिटल मध्ये खूप कमी जणांना उपचार घ्यावे लागतील, त्याहून कमी लोकांना ऑक्सिजनची आवश्यकता असेल तर मृत्यूचे प्रमाण नगण्य राहील, असे सांगतानाच हा केवळ प्राथमिक अंदाज आहे. हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले तथापि काळजी घेण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला

Displaying DSC_0486.JPG

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते आज दि. १ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले होते तर यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव व कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांची मंचावर उपस्थिती होती.

Displaying DSC_0434.JPG

यावेळी २०२० व २०२१ यावर्षीचे जीवनसाधना गौरव पुरस्कार देऊन अनुक्रमे माजी कुलगुरू ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचा डॉ. लहाने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पंचवीस हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच यावेळी  उत्कृष्ट  प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षेकेत्तर कर्मचारी व उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Displaying DSC_0438.JPG

यावेळी सत्काराला उत्तर देतांना माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात माझा जन्म झाला. इथल्या मातीचे आणि माणसाचे संस्कार यातून मी घडत गेलो. हेमचंद्र धर्माधिकारी, ना.य. डोळे यांच्या सारख्या ध्येयवादी प्राचार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची जाणीव निर्माण झाली. सामाजिक जाणीव जोपासणारा प्राचार्य असेल तर त्याचे परिणाम निश्चितपणे होतात. पूर्वी शिक्षणाला ध्येयवादाची  जोड होती. पैसे न घेता शिक्षक अधिकचे वर्ग घेवून मुलांना घडवीत. आता ट्युशन, क्लासेसच्या तीन तीन मजली इमारती दिसतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना वसतीगृहात अन्न मिळावे म्हणून आपल्या पत्नीच्या सोनाच्या बांगड्या विकल्या. आज आपल्या बायकोच्या अंगावर सोन्याचे दागिने घालण्यासाठी लोक शिक्षण संस्था काढत आहेत. या विरोधा भासाकडे त्यांनी लक्ष वेधले. हा माहेरचा सत्कार आहे. त्याचा मला आनंद आहे. अशा भावना त्यांनी व्यक्त केला.

भारतीय संशोधनाचा जागतिक पातळीवरचा वाटा केवळ अडीच टक्के आहे. तर आपण ज्या देशाशी स्पर्धा करू पाहत आहोत त्या चीनचा वाटा सहा टक्के आहे. जे संशोधन आपल्या देशात होते व त्याचा दर्जा चिंता करावी असा आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण आता आले आहे. धोरण कोणतेही असो सध्या शिक्षण क्षेत्राला भेडसावणारे प्रश्न कसे सोडवणार आहोत आणि हे धोरण समाजाच्या सर्व घटकांना सामावून घेणारे आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.

Displaying DSC_0466.JPG

जीवन गौरव पुरस्कारला उत्तर देताना आपल्या मनोगतात श्री. बाळासाहेब जाधव यांनी जिथे आवश्यक गरज आहे तिथे मी कार्य केले आहे. ग्रामीण भागातील ८५ टक्के प्रश्नांना सामोरे जाताना येणाऱ्या अडचणींचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. गोर-गरीब, शेतमजूर, कष्टाळू यांचे प्रश्न ग्रामीण भागात राहून कामे पूर्ण करणे या कार्यास मी प्राधान्य दिले आहे.

दहा मुख्यमंत्री यांच्या सोबत राहून मराठवाड्याचा मागासलेपणा कमी करण्याचा मुंबईत राहून प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला मिळालेली पंचवीस हजार रुपयाचा पुरस्कार आणि यामध्ये मी माझ्या स्वतःचे पाच लक्ष देत आहे. यांचा उपयोग विद्यापीठात शिष्यवृत्ती देण्यासाठी करावा असेही त्यांनी सांगितले. आपल्या मराठवाड्यातील युवकांना प्रचंड कष्ट करण्याची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. गाव सोडले तर विकास होतो यावर त्यांनी भर दिला.

अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले, आर्थिक उन्नती आणि प्रबळ मिलटरी यातून राष्ट्र सामर्थ्यशाली होते असे मानले जात असे, पण देशातील प्रगत शिक्षण व्यवस्था आणि त्या देशातील शांततापूर्ण वातावरण यावरून देश सामर्थ्यशाली ठरतो. त्यामुळे लोकाभिमुख संशोधनावर विद्यापीठ भेट देत आहे. आज देशात एक हजार  विद्यापीठे आणि दोनशेहून अधिक संशोधन संस्था आहेत, पण अद्याप आपल्या देशास नोबल पुरस्कार मिळालेला नाही. पण ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. डॉ. कोतापल्ले आणि श्री. जाधव यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करतानांच  यावेळी अहमदपूर येथील आमदार बाळासाहेब जाधव आपल्या वैयक्तिक, सार्वजनिक व व्यावसायिक जीवनात आदर्श त्याचा बाळगावा, असे ते म्हणाले.

प्रा. डॉ. शैलजा वाडीकर यांनी आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ एम.ए. इंग्रजी या विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकावन्न हजार रुपयांचा धनादेश कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर या पैशातून मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी स्वर्गीय गंगाबाई भुजंगराव वाडीकर यांच्या स्मरणार्थ पारितोषिक दिले जाणार आहे.

या समारंभास अहमदपूर येथील आमदार बाबासाहेब जाधव , व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, संविधानिक अधिकारी, प्राध्यापक, अधिकारी व व कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये प्रारंभी स्वामीजींच्या प्रतिमेस चंदन हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन केले. डॉ. कोतापल्ले यांच्या मानपत्राचे वाचन डॉ. केशव देशमुख यांनी केले तर बाळासाहेब जाधव यांच्या मानपत्राचे वाचन डॉ. पी. विठ्ठल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. पृथ्वीराज तौर यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने  समारंभाची सांगता झाली.