‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात येणार-कुलगुरू डॉ. उद्धव भोसले

नांदेड,२७ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा कक्ष लवकरच स्थापन करण्यात येईल. असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केले. ते दि. २५ नोव्हेंबर रोजीच्या अजीवन व अध्ययन विस्तार मंडळाच्या वतीने महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या (फेस्कॉम) प्रतिनिधीच्या आयोजित बैठकीमध्ये बोलत होते. 

या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञनोबा मुंढे, अजीवन अध्ययन व विस्तार मंडळाचे प्र. संचालक डॉ. शिवराज बोकडे, अध्यक्ष श्री. अशोक तेरकर, सचिव जयवंत सोमवाड, मुख्य समन्वयक, सल्लागार, कार्यकारणी सदस्य श्री. एकनाथ मोरे, डॉ. निर्मला कोरे, जयश्री तोडकरी, श्री. एन. आर. वाढोनकर, अॅड. महम्मद झुल्फीकारोद्दिन सिद्धिकी यांची उपस्थिती होती. 

या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाने अनेक मागण्या कुलगुरू समोर मांडल्या. यावर कुलगुरू महोदयांनी सकारत्मक प्रतिसाद देत जास्तीत जास्त मागण्या मान्य करून अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. या प्रमुख मागण्यामध्ये बहि:शाल व्याख्यान मालेत ज्येष्ठांचा विषय तथा सहभाग असावा, वर्षातून किमान एक वेळा विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात परिसंवाद घडवून आणावा, विद्यापीठामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष असावा इत्यादी मागण्यांचा समावेश होता.  

ज्येष्ठ नागरिकांना पीएच.डी करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने देण्यात आलेल्या सवलतीचे कौतुक या महासंघातर्फे करण्यात आले. त्याच बरोबर या निर्णया बाबत महासंघाच्या वतीने कुलगुरू महोदयांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.