संविधानाने माणसाला जगण्‍याचा हक्‍क दिला-अंजली कुलकर्णी

नांदेड,२७ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने आपल्‍या देशाला संविधान दिल्‍यामुळे भारतीय लोकांच्‍या जीवनात आमुलाग्र बदल झाला. डॉ. आंबेडकर यांनी राज्‍यघटनेच्‍या माध्‍यमातून एक प्रकारे सामाजिक क्रांतीच केली. त्‍यामुळे सर्वसामान्‍य माणसांना जगण्‍याचा हक्‍क मिळला’ असे प्रतिपादन राज्‍यघटनेच्‍या अभ्‍यासक आणि ज्‍येष्‍ठ कवयित्री अंजली कुलकर्णी (पुणे) यांनी केले. स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्‍यासन व अभ्‍यास केंद्राने संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्‍या विशेष व्‍याख्‍यानात त्या बोलत होत्या.                                                                                           

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. उध्‍दव भोसले  हे होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य डॉ. अशोक टिपरसे, आणि परीक्षा व मूल्‍यमापन मंडळाचे संचालक, डॉ. रवि एन. सरोदे, अध्‍यासन केंद्राचे समन्‍वयक, डॉ. पी. विठ्ठल यांची उपस्थिती होती.  

यावेळी बोलताना अंजली कुलकर्णी म्‍हणाल्‍या की, राज्‍यघटनेमुळे चातुरवर्णीय व्‍यवस्‍था नष्‍ठ झाली स्‍वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्‍याय हे संविधानाचे तत्‍व आहे. संविधान हा कायदा नाहीतर तत्‍वज्ञान आहे ते महाकाव्‍य आहे. मात्र राज्‍यघटनेने दिलेले अधिकार धारण करायला आपण अजून पात्र झालेलो नाहीत आपल्‍याला आपली मानसिकता बदलावी लागेल. 

         अध्‍यक्षीय समारोप करताना कुलगुरू डॉ. उध्‍दव भोसले म्‍हणाले की, ‘आपण प्रत्‍येकाने आपली कर्तव्‍य प्रामाणिकपणे पूर्ण करावीत, तरच ख-या आर्थाने लोकशाही रूजेल.’ प्रारंभी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्‍वामी रामानंद तीर्थ यांच्‍या प्रती‍मेला पुष्‍पहार अर्पण करून अभिवादन करण्‍यात आले तसेच उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्‍यात आले व डॉ. जी. बी. कत्तलाकुटे,  युवराज मोरे, सदानंद अंभूरे, प्रभाकर हटकर यांनी अध्‍यासन केंद्रास ग्रंथ भेट दिली. यावेळी  उपकुलचिव, डॉ. डी. एम. तंगलवाड, डॉ. केशव देशमुख, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. डी. एम. खंदारे, कैलाश पुपलवाड, सुनिल ढाले, सुनिल रावळे, संदीप एडके, डॉ. नितिन गायकवाड, हरीदास जाधव, प्रदीप बिडला, मनोज टाक, दिनेश हनवते, मारोती सोनपारखे, सुभाष हनवते यांच्‍यासह विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.