अबब… 3 किलोमीटर मार्गावर छोटे-मोठे 553 खड्डे .!

शिऊर बंगला-तलवाडा रस्त्याची दुरावस्था सा.बा.खात्याचे दुर्लक्ष ; उपसभापती योगिता निकम यांचे उपोषण

Displaying IMG-20211125-WA0164.jpg

वैजापूर ,२५ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- औरंगाबाद-नाशिक मार्गावरील शिऊर बंगला ते तलवाडा या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून, रस्त्यात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.या खड्डयांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वैजापूर पंचायत समितीच्या उपसभापती योगिता निकम या शनिवारपासून (ता.27) शिऊर बंगला येथे आमरण उपोषण करणार आहेत.

या संदर्भात श्रीमती निकम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना निवेदनात नमूद केले आहे की, शिऊर बंगला ते तलवाडा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात मोठ – मोठे खड्डे पडले असून रस्ता नावापुरताच उरला आहे. खराब रस्त्यामुळे अपघात वाढले असून वृध्द, महिला व शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. औरंगाबाद ते नाशिक मार्ग हा अत्यंत वर्दळीचा या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक सुरू असते.खड्डयातून रस्ता शोधतांना वाहनचालकांना सर्कस करावी लागते. खराब रस्त्यामुळे महिलेची रस्त्यातच प्रसूती होऊन नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे.रस्त्यासंदर्भात ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी अनेकवेळा निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतलेली नाही. थातुरमातुर मुरूम टाकून वेळ मारुन नेणे यापलीकडे काही झाले नाही.3 किलोमीटर मार्गावर छोटे- मोठे 553 खड्डे पडले आहेत.धोकादायक खड्डे बुजून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल.