‘मैत्रेय’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्यासाठीच्या प्रक्रियेला गती देण्याचे राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे निर्देश

मुंबई,२५ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- मैत्रेय कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा देण्यासाठी कंपनीच्या मालमत्ता न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने लिलावात काढण्यात याव्यात, असे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी दिले. यासंदर्भात राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरूद्ध एकूण ३२ जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत. राज्यमंत्री श्री.देसाई यांनी फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने यावेळी निर्देश दिले.

गृह राज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले, मैत्रेय कंपनीने राज्यातील लाखो गुंतवणुकदारांना फसविले असून संबंधित गुन्हेगारांपैकी एक फरार व एक तुरूंगात आहे. हे प्रकरण निकालात काढून मालमत्तेचा लिलाव करण्यासाठीची परवानगी मिळावी यासाठी संबंधित विभागाने न्यायालयास विनंती करावी. न्यायालयाच्या निकालानंतर तातडीने मालमत्ता लिलावात काढण्याच्या प्रक्रियेसंदर्भात सक्षम प्राधिकारी यांनी प्रस्ताव पाठवावा. आर्थिक गुन्हे शाखेने पुढील प्रक्रिया करुन मालमत्ता लिलावात काढावी आणि संबंधित गुंतवणुकदारांना दिलासा द्यावा, असे निर्देशही राज्यमंत्री श्री.देसाई यांनी दिले.

या बैठकीस आमदार प्रकाश आबीटकर, आमदार किशोर पाटील, आमदार महेश शिंदे, गृह विभागाचे उपसचिव रमेश मनाळे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

‘पॅनकार्ड क्लब लिमिटेड’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी – राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे निर्देश

‘पॅनकार्ड क्लब लिमिटेड’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी

पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळावा यासाठीच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. संबंधित सक्षम प्राधिकरण अधिकारी यांनी कंपनीच्या मालमत्तेच्या लिलावासंदर्भातील प्रकिया तातडीने राबवावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासदंर्भात राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री श्री.देसाई यांनी आर्थिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या.

राज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले, सिंधुदुर्ग, अमरावती, सातारा, नाशिक, नवी मुंबई, नागपूर येथे या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५१ लाख गुंतवणुकदारांची फसवणूक झाली आहे. या गुंतवणुकदारांना दिलासा देण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने मालमत्ता लिलावाची प्रक्रिया करण्यात यावी. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा असे निर्देशही राज्यमंत्री श्री.देसाई यांनी दिले.