महावितरणच्या वीजतोडणी विरोधात मनसे आक्रमक ; बाभूळगावगंगा येथे गोदावरी नदीच्या पुलावर सुमारे दोन तास रास्तारोको आंदोलन

वैजापूर ,२४ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून त्याची भरपाई रब्बी हंगामात होईल या आशेने शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीस सुरुवात केली असताना वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांचे कृषिपंपाची वीज तोडण्यात येत आहे. महावितरणच्या या वीज तोडणीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वैजापूर तालुक्यातील बाभूळगावगंगा येथे गोदावरी पुलावर बुधवारी सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नांसंदर्भात अनेकवेळा निवेदने देऊनही त्याची दखल न घेतल्यामुळे महावितरणच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी करून रस्ता अडवून धरल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील घंगाळे, तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड,जिल्हा सचीव गणेश भारती, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जयश्री बागुल,मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष मनोज पुंडेकर, नंदू हिरडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आंदोलनाचे नेतृत्व केले. महावितरणचे सहाय्यक अभियंता राहुल बडवे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मनसे कार्यकर्त्यांशी चर्चा केली व आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य  करून आंदोलन थांबविण्याबाबत विनंती केली. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात योगेश तुपे,सागर फुलारे, अमोल काळे,सुनील सुराशे,अमोल गांगुले, संदीप साळुंके,सिताराम पानकर, गणेश बहाळस्कर, अमोल वाणी, गणेश कदम, सुधीर फुकटे, योगेश थोटे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.