अवैधरित्‍या गुटख्‍याची विक्री करणाऱ्या किराणा दुकानदाराला अटक

८७ हजार १६५ रुपये किंमतीचा गुटखा जप्‍त

औरंगाबाद,२४ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- अवैधरित्‍या गुटख्‍याची विक्री  करणाऱ्या किराणा दुकानदाराला एमआयडीसी सिडको पोलिसांनी बुधवारी छापा मारुन अटक केली. त्‍याच्‍याकडून ८७ हजार १६५ रुपये किंमतीचा गुटखा जप्‍त करण्‍यात आला आहे.विजय बळीराम बनसोडे (४१, रा. नारेगाव) असे किराणा दुकानदाराचे नाव असुन त्‍याला गुरुवारपर्यंत दि.२५ पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एस. वानखेडे यांनी दिले.

या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस  ठाण्‍याचे शिपाई नितेश शामसिंग सुंदर्डे (३१) यांनी फिर्याद दिली. सुंदर्डे हे कर्तव्‍यावर असताना बुधवारी दि.२४ सकाळी साडे सहा वाजेच्‍या सुमारास माहिती मिळाली की, पुजा किराणा स्‍टोअर्स या दुकानाचा मालका घरी गुटख्‍याचा साठा करुन त्‍याची विक्री करित आहे. माहिती आधारे उपनिरीक्षक एस.बी. जाधव व त्‍यांच्‍या पथकाने पुजा किराणा स्‍टोअर्स मालक विजय बनसोडे याच्‍या घरावर छापा टाकला. पोलिसांची चाहुल लागताच विजय साबळे याने पळून जाण्‍याच प्रयत्‍न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करुन त्‍याच्‍या मुसक्या आवळल्या. साबळेची घरझडती घेतली असता बाथरुममध्‍ये लपवलेल्या गोण्‍यांमधुन पोलिसांनी सुमारे ८७ हजार १६५ रुपये किंमतीचा गुटखा जप्‍त केला.या  प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस  ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी आरोपीने गुटखा कोणाकडून आणला, कोणाला विक्री करणार होता. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.