पालिकेच्या लसीकरण मोहिमेला वैजापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद ; दोन दिवसांत अडीच हजार नागरिकांचे लसीकरण

वैजापूर ,२४ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर पालिकेने शंभर टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने शहरात 22 नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम सुरू केली असून या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.गेल्या दोन दिवसांत अडीच हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Displaying IMG-20211123-WA0177.jpg

उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, पालिकेच्या नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान व मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे.पालिका पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागात लसीकरणासाठी पुढाकार घेतला घेतला असून लसीकरण न केलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्याला आग्रह धरला जात आहे. या विशेष लसीकरण मोहिमेत शहरात गेल्या दोन दिवसांत 2 हजार 522 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय (700), नगरपालिकेचे भगवान महावीर रुग्णालय (724), कादरीनगर उर्दू शाळा ( 572), इंदिरानगर शाळा (366) या केंद्राचा समावेश आहे. शहरात 18 वर्षावरील नागरिकांची संख्या 38 हजार 691 असून आतापर्यंत 32 हजार 209 जणांनी पहिला तर 13 हजार 135 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

‘हर घर दस्तक’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन लस न घेणाऱ्याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून पालिकेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्या आवाहनास शहरातील नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. पालिकेच्या भगवान महावीर रुग्णालय व शहरातील विविध केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी होत आहे.पालिकेच्यावतीने मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात येत असून, शहरात रिक्षा फिरवून ध्वनिक्षेपकाद्वारे लस घेण्याबाबत जाहीर आवाहन केले जात आहे. पालिका पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेसाठी उपमुख्याधिकारी राहुल साठे, शिक्षणाधिकारी मनिष गणवीर,स्वछतादूत ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सविता निकाळे, परिचारिका निर्मला जाधव, समुदाय संघटक दिवाकर त्रिभुवन व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.