‘नो व्हॅक्सिनेशन..नो पेट्रोल’ या आदेशाचा भंग ; वैजापूर येथील बोथरा पेट्रोल पंप सील

वैजापूर ,२३नोव्हेंबर /प्रतिनिधी :- कोरोना नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक प्रशासनाने कठोर पाऊल उचलले असून मास्क न घातलेल्या वाहनधारकांना पेट्रोल दिल्याचे निदर्शनास आल्याने उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी सोमवारी (ता.22) सायंकाळी वैजापूर येथील एस.पी.बोथरा पेट्रोल पंप सील केले आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप धारक,गॅस एजन्सी,स्वस्त धान्य दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ग्राहकांकडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना व आदेश 9 नोव्हेंबर रोजी जारी केले होते. तसेच या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत तपासणी करण्याचे आदेश देखील संबंधित यंत्रणेला देण्यात आले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्यासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील एस.पी.बोथरा या पेट्रोल पंपाची पाहणी व तपासणी केली असता ‘नो व्हॅक्सिनेशन – नो पेट्रोल’ या आदेशाचा भंग होत असल्याचे निदर्शनास आले.मास्क चा वापर न करणे,लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी न करता पेट्रोल देणे अशा गोष्टी आढळून आल्याने पेट्रोल पंप सील करण्यात आले आहे.