स्टार्टअप प्रोग्रामींगमध्ये डोणगावचा ऋषिकेश ठरला इंडियन अचिव्हर्स अवार्डचा मानकरी

खुलताबाद,२१ नोव्हेंबर/प्रतिनिधी :- इंजिनियरींगचे शिक्षण घेउन् आय.टी. कंपन्यांमध्ये मोठ- मोठ्या पॅकेजच्या  ऑफर असताना त्यांच्या मागे न जाता व पुण्यासारखे आय.टी. चे माहेरघर असलेले शहर सोडून औरंगाबादमध्ये आपल्या व्यवसायाचा प्रारंभ करणाऱ्या गंगापूर तालुक्यातील डोणगावच्या ऋषिकेश शिवाजी पाटील डोणगावकर याला देशपातळीवरील स्टार्टअप प्रोग्रामींग मध्ये सहा हजार स्पर्धकांमधून पहिल्या पाचमध्ये स्थान मिळून इंडियन अचिव्हर्स अवार्डने गौरवण्यात आले आहे.

Displaying 20211119_120215.jpg

अवघ्या २३ वर्षाच्या  ऋषिकेशने दोन वर्षापूर्वी पुणे येथील एका नामांकित महाविद्यालयात इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच्याकडे असलेल्या गुणवत्तेमुळे त्याला अनेक नामांकित कंपन्यांच्या नोकरीसाठी ऑफर आल्या होत्या परंतु त्यामागे न जाता   औरंगाबादमध्ये या क्षेत्रामध्ये  भरपूर संधी असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने येथेच करियर करण्याचा निर्णय  घेतला.  दोन- तीन सहकारी मित्रांच्या मदतीने त्याने ‘इंसिपिअंट टेक्नालाजीज’ या स्टार्टअप कंपनीची स्थापना केली. या कंपनीद्वारे औरंगाबादच्या ज्या उद्योगांना आर्टिफिशीयल इंटेलिजन्स आधारित प्रोग्रामींग सारख्या कामासाठी पुण्या- मुंबईच्या साफ्टवेअर कंपन्यांना लाखो करोडो रूपये द्यावे लागायचे ते काम अतिशय कमी खर्चात व कमी वेळेत व दर्जेदारपणे करून देण्यात नावलौकिक मिळवल्यामुळे औरंगाबादसह परिसरातील अनेक कंपन्यांनी नवउद्योजक असलेल्या ऋषिकेषच्या स्टार्टअप कंपनीला पसंती देण्यास सुरूवात केली आहे.

सहा हजार स्पर्धकांमधून निवड झालेल्या या  पुरस्काराबद्दल बोलताना ऋषिकेशने सांगितले की, भारतातील आय.टी.क्षेत्रातील नामांकित असलेल्या इंडियन अचिव्हर्स फोरमतर्फे स्टार्टप कंप्युटर प्रोग्रामींगसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये ‘व्हीडीओ प्रोमिसिंग कॅटागिरी’च्या गटामध्ये संपूर्ण भारतामधून सहा हजार स्पर्धक सहभागी झाले होते त्यातून पहिल्या पाचमध्ये येण्याचा मान त्यांच्या स्टार्टअप कंपनीला मिळाला आहे.आर्टिफीशियल इंटेलीजिंट आधारित    मी सादर केलेल्या संगणक तंत्रज्ञानामध्ये आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा वापर केला असून त्या आधारे मोठमोठ्या बँका, कार्पोरेट कार्यालये, रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्थानक, पार्किंग, सिनेमागृहे, कंपन्या, शासकीय कार्यालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांमध्ये क्रांती येउ शकते. या तंत्रज्ञानाच्या आधारे आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने क्रांतिकारी बदल घडू शकतो. सध्या हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी आमच्या कंपनीचा प्रयत्न सुरू असल्याचे ऋषिकेश डोणगावकर याने सांगितले. त्याच्या यशाबद्दल  सर्वत्र त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.