भारताचे निर्भेळ यश,३-०ने मालिका जिंकली

तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताची न्यूझीलंडवर  ७३ धावांनी मात

कर्णधार रोहित शर्मा मालिकावीर -३ सामन्यांत १५९ धावा 
३ बळी घेणारा अक्षर पटेल सामनावीर 

कोलकाता :-भारताचा नवा कर्णधार  रोहित शर्मा आणि नवा मुख्य प्रशिक्षक  राहुल द्रविड यांनी पहिल्याच  तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले आहे. ईडन गार्डन्स मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ७३ धावांनी विजय मिळवला. 

Image

रोहितने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने ईडनवर आपला खेळ पुन्हा बहरत मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक ठोकले. रोहितच्या ५६ धावा आणि शेवटी दीपक चहरने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने २० षटकात ७ बाद १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे फलंदाज १७.२ षटकात १११ धावांवर ढेपाळले. भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वाधिक ९ धावांत ३ बळी घेतले. तर हर्षलला २ बळी घेता आले. अक्षरला सामनावीर, तर रोहितला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Image

भारतीय गोलंदाजांनी  न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन आणि ग्लेन फिलिप्स यांना पॉवरप्लेमध्ये बाद केले. सलामीवीर मार्टिन गप्टिलने पुन्हा एकदा भारतासमोर प्रभावी ठरत अर्धशतक ठोकले. त्याने ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५१ धावा केल्या. आज संधी मिळालेल्या यजुर्वेंद्र चहलने ११व्या षटकात माघारी पाठवले. गप्टिलनंतर मात्र न्यूझीलंडचे इतर फलंदाजांनी भारतीय माऱ्यासमोर नांग्या टाकल्या. १११ धावांवर न्यूझीलंडचा संघ गारद  झाला

केएल राहुलच्या जागी  संधी मिळालेल्या इशान किशनसोबत रोहित शर्माने सलामी दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी फलकावर लावली. दोघांच्या आक्रमक फटकेबाजीमुळे भारत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करू लागला. पण कर्णधार  मिचेल सँटनरने सातव्या षटकात किशन (२९) आणि सूर्यकुमार यादव (०) यांना तंबूत धाडले. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतलाही (४) मोठी खेळी करता आली नाही. दुसऱ्या बाजूला स्थिरावलेल्या रोहितचेही संतुलन ढासळले आणि तो संघाचे शतक फलकावर लावून तंबूत परतला. फिरकीपटू ईश सोधीने त्याचा एकहाती अप्रतिम झेल टिपला. रोहितने ३ चौकार आणि ६ षटकारांसह ५६ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांनी छोटी भागीदारी रचली. व्यंकटेशने २० तर अय्यरने २५ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या हर्षल पटेलने १८ धावांचे योगदान दिले. तर शेवटच्या षटकात दीपक चहरने १९ धावांची फटकेबाजी केली. दीपकने २१ धावांची खेळी केली. २० षटकात भारताने ७ बाद १८४ धावा केल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक २७ धावांत ३ बळी घेतले.न्यूझीलंडने आपला कर्णधार  बदलला. टिम साऊदी ऐवजी मिचेल सँटनरने नेतृत्व केले.

————————–

कोलकात्यात रोहितने  अर्धशतक ठोकत रचला ‘नवा’ विक्रम!

रोहितचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. रांचीतही त्याने ५०हून अधिक धावा बनवल्या होत्या. आता त्याने ईडन गार्डन्सवर अजून एक अर्धशतकी खेळी करत विराट कोहलीला मागे टाकले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५० हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहितने विराटला मागे टाकले.आज रोहितने ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. 

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक 

  • ३० रोहित शर्मा (४ शतके)
  • २९ विराट कोहली
  • २५ बाबर आझम (एक शतक)
  • २२ डेव्हिड वॉर्नर (एक शतक)