देशात बरे होणाऱ्या रुग्णांचा दर जवळपास 60%
बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रीय रुग्णांच्या तुलनेत आता 1 लाख 20 हजार
नवी दिल्ली, 30 जून 2020
कोविड-19 चे व्यवस्थापन आणि नियंत्रण यासाठी केंद्र सरकार सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने करत असलेल्या एकत्रित आणि केंद्रित प्रयत्नांमुळे कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर आता वेगाने 60 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
आजपर्यंत, सक्रीय रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या, 1,19,696 इतकी जास्त झाली आहे.तसेच, 2,15,125 सक्रिय रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु असून, तर 3,34,821 रूग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोविड-19 च्या रुग्णांचा बरे होण्याचा दर, 59.07 टक्के इतका झाला आहे.

गेल्या 24 तासांत, एकूण 13,099 कोविड-19 रुग्ण बरे झाले आहेत.चाचणी प्रयोगशाळांची संख्या सतत वाढत आहे. भारतात सध्या कोविड-19 साठी समर्पित 1049 निदान प्रयोगशाळा आहेत. यामध्ये शासकीय क्षेत्रातील 761 प्रयोगशाळा आणि 288 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.

या प्रयोगशाळांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :–
- रियल टाईम –RT PCR आधारित चाचणी प्रयोगशाळा: 571 (सरकारी: 362 + खासगी: 209)
- TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 393 (सरकारी :367 + खासगी: 26)
- CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 85 (सरकारी: 32 + खासगी: 53)
नमुना चाचणी देखील जोरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 2,10,292 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 86,08,654 आहे.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय रक्त संक्रामण/संचरण परिषदेने कोविड-19 साथीच्या आजाराच्या काळात संक्रामण सेवा सुरक्षितपणे आयोजित करण्यासाठी द्वितीय अंतरिम मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे नियोजन आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत आढाव्यासोबतच लस कधी तयार होऊ शकेल, यावरही चर्चा झाली. भारतासारख्या विशाल आणि विविधांगी लोकसंख्येच्या देशासाठी लसीकरण करण्यासाठी अनेक मुद्दे विचारात घ्यावे लागतील. यात, वैद्यकीय पुरवठा साखळीचे व्यवस्थापन, जास्त धोका असलेल्या लोकांना प्राधान्यक्रम, या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या सर्व संस्थांमधील समन्वय तसेच, खाजगी क्षेत्रांची आणि नागरी समाजाची भूमिका अशा सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. या राष्ट्रीय प्रयत्नांची पायाभरणी तयार करणारी महत्वाची मार्गदर्शक तत्वे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितली.