मुस्लिम आरक्षणावर एमआयएमचा रस्त्यावर लढा -एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी

शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीला ओवेसी यांनी विचारले प्रश्न

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते आता गप्प का आहेत?

औरंगाबाद,१८ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- मराठा आरक्षण आंदोलनकर्ते आता गप्प का आहेत? त्यांनी लढावं आम्ही त्यांना साथ देऊ, आरक्षणासाठी मराठा समाज जसा रस्त्यावर उतरला, तसे पर्याय एमआयएम स्वीकारून रस्त्यावर येऊन लढावे लागणार आहे. मुस्लिम समाज आता  अन्याय सहन करणार नाही असा इशारा  एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी दिला  आहे. 

महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाची स्थिती या विषयावर दुआ फाउंडेशन आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट पॉलिसी अँड प्रॅक्टिस यांच्यावतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी ओवेसी औरंगाबाद येथे आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.यावेळी खासदार इम्तियाज जलील ,माजी आमदार वारीस पठाण आदी उपस्थित होते. 

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकालात महाराष्ट्रातील ५० जातींना शिक्षणात आरक्षण देता येतं असं म्हटलंय. कारण या जातींच्या सामाजिक राजकीय मागसपणाची आकडेवारी आणि माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे यानंतरही या जातींना शिक्षणात आरक्षण न देणं अन्याय आहे.”

तुम्ही मराठा आरक्षणावर बोलता मग मुस्लिम आरक्षणावर का बोलत नाही? तुम्हाला कोण रोखत आहे? मराठा समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. हायकोर्टाने मुस्लिम आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं स्पष्ट केलं आहे. मग तुम्ही त्यांना आरक्षण का देत नाही? असा सवालही त्यांनी केला.

उशीर किती झाला हे महत्त्वाचं नाही, न्याय झालाच पाहिजे

संसदेत आता कायदाही मंजूर केला. त्यामुळे राज्य सरकार आरक्षण देऊ शकते. 50 टक्क्याच्यावर आरक्षण जात असेल तर गोष्ट वेगळी आहे. एखाद्याचा खून झाला. संपूर्ण कुटुंब संपवता. कोर्टात 15 वर्ष खटला चालतो म्हणून केस संपुष्टात आणतात का? वर्ष किती झाले हे महत्त्वाचं नाही, किती उशीर झाला हेही महत्त्वाचं नाही. न्याय तर झाला पाहिजे. समानता हा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे राज्यातील मुस्लिम समाजातील लोकांना आरक्षण दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.

मराठा समाजाने एकीने सगळ्या राजकीय पक्षांना झुकवले आणि आरक्षण मिळवले, ते गेलेही, मात्र आता मराठा समाज शांत का? यापुढे आम्हीदेखील येतो तुमच्यासोबत, 27 नोव्हेंबरला मुंबई जाण्याचा नारा आम्ही दिला आहे. तुम्ही म्हणता समर्थन नाही, बघा त्या गर्दीत आमची यूनिटी आमची ताकत दिसेल. जसे मराठा रस्त्यावर आले तसे आम्हीही उतरू शकतो तोही ऑपशन आहे आमच्याकडे, नागपूर सेशनमध्ये मुस्लीम आरक्षण बिल आणावे, अन्यथा लढा सुरू राहणार आणि वाढणार, असे ओवैसी यांनी सांगितले. त्याचबरोबर महाराष्ट्रात दंगल झाली त्याचा निषेध आहे, मी लोकांना शांत राहण्याचे आवाहन करतो, या घटनेची याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ओवेसी यांनी केली.

राज्यातील किती मुस्लिमांकडे पाच एकरपेक्षा अधिक शेती आहे? किती टक्के मुस्लिमांना बँका आणि सोसायट्यांमधून कर्ज मिळतं? किती मुस्लिम झोपडपट्ट्यात राहतात? किती मुस्लिम पदवीधर आहेत? किती मुस्लिमांच्या शाळा आहेत? हे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपने सांगावं. त्यावर तुम्ही म्हणाल उशीर झाला…. उशीर होवो अथवा न होवो… तुम्हाला न्याय द्यावाच लागेल. नागपूर हिवाळी अधिवेशनात विधेयक आणा आणि आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली.

ओवेसींचे शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीला ‘हे’ प्रश्न

“माझे शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीला काही प्रश्न आहेत त्याचे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरं द्यावीत,” अशी मागणी ओवेसींनी केली.

१. किती टक्के मुस्लिमांकडे ५ एकरपेक्षा अधिक जमीन आहे
२. किती मुस्लिमांना बँक आणि सहकारी सोसायट्यांकडून कर्ज मिळतं
३. किती मुस्लीम झोपडपट्टीत राहतात
४. किती मुस्लीम पदवीचं शिक्षण घेतात
५. किती मुस्लीम शाळा आहेत

अमरावती आणि मालेगाव येथे झालेल्या दंगलींचा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निषेध केला. या दंगली शांत समाजासाठी घातक आहेत. राज्यात शांतता राहावी ही राज्याच्या विकासाला आवश्यक बाब आहे. अशा पद्धतीने कोणी दंगल घडवून अशांतता माजवत असेल तर निश्चितच उच्चस्तरिय समितीच्या माध्यमातून चौकशी करून अशांविरोधात कारवाई करण्याची गरज असल्याचे ओवेसी यांनी सांगितले. राज्यात काही संघटनांकडे भाजपाची बी टीम म्हणून पाहिले जात असल्याचे पत्रकार म्हणाले. त्यावर खासदार ओवेसी यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले. बी टीमचा कॉपीराइट माझ्याकडे आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे ओवेसी म्हणताच हंशा पिकला. आता तर आम्ही ए टीम झाल्याचेही ते पुढे म्हणाले.