अर्थव्यवस्थेला नवी उर्जा देण्यात भारतीय बँका आज सक्षम-पंतप्रधान नरेंद्र मोदी

निर्वेध पतपुरवठा आणि आर्थिक वृद्धीसाठी एकत्रित उर्जा निर्माण करणे’या विषयावरील परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण

स्वातंत्र्याच्या ‘अमृत काळात’,भारतीय बँकिंग क्षेत्र भव्य कल्पना आणि नवीन दृष्टीकोन घेऊन पुढे जाईल

नवी दिल्ली,१८ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-

‘निर्वेध पतपुरवठा आणि आर्थिक वाढ होण्यासाठी एकत्रित उर्जा निर्माण करणे’ विषयावरील परिषदेच्या समारोप कार्यक्रमात आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भाषण झाले.

गेल्या 6 – 7 वर्षात बँकिंग क्षेत्रात सरकारने केलेल्या सुधारणांमुळे, बँकिंग क्षेत्राला मोलाची मदत झाली आहे, ज्यामुळे देशाचे बँकिंग क्षेत्र आज अतिशय मजबूत स्थितीत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. बँकाचे आर्थिक आरोग्य आता लक्षणीयरीत्या सुधारले आहे. 2014 पूर्वीपासूनच्या एक एक समस्या आणि आव्हाने दूर करण्याचे मार्ग शोधण्यात आले. “आम्ही अनुत्पादक मालमत्तांची समस्या सोडवली, बँकांचे पुनर्भांडवलीकरण करून त्यांची ताकद वाढवली. आम्ही आयबीसी सारख्या सुधारणा आणल्या, अनेक कायदे बदलले आणि कर्ज वसुली प्राधिकरणाचे सक्षमीकरण केले. कोरोना काळात बुडीत अनुत्पादक मालमत्ता व्यवस्थापनासाठी समर्पित प्रणाली तयार करण्यात आली,”  असेही मोदी म्हणाले.

“भारतीय बँका आज देशाच्या अर्थव्यवस्थेत नवी ऊर्जा निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावण्याइतक्या सक्षम झालेल्या आहेत. भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला या बँका मोठे पाठबळ देऊ शकतात.” असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही वर्षात, आम्ही  आवश्यक ती पावले उचलत या बँकाकडे मोठा भांडवली आधार असेल, अशी तरतूद केली आहे. त्यामुळे आज बँकाकडे आवश्यक तेवढा रोख पैसा आहे तसेच, अनुत्पादक मालमत्ताची कुठलीही थकबाकी नाही, कारण आज सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची अनुत्पादक मालमत्ता गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी आहे. यामुळे, आंतरराष्ट्रीय संस्थांचा भारतीय बँकांविषयीचा दृष्टिकोन बदलून बँकांचे रेटिंग सुधारले आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. अर्थव्यवस्थेतील हा एक मैलाचा दगड तर आहेच, त्याशिवाय, हा टप्पा एक आरंभबिंदु आहे, असेही म्हणता येईल,असे पंतप्रधान म्हणाले. बँकिंग क्षेत्राने, संपत्ती निर्माण करणाऱ्या आणि रोजगार निर्माण करणाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. “ आपला ताळेबंद मजबूत ठेवतांनाच देशाच्या संपत्तीची निर्मितीला पाठबळ आणि प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी सक्रियपणे पुढाकार घ्यायला हवा.” असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.

पंतप्रधानांनी ग्राहकांना सक्रियपणे सेवा देण्याच्या गरजेवर भर दिला. बँकांनी ग्राहक, कंपन्या आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांच्या गरजांचे विश्लेषण करून त्यानुरुप उपाय द्यावेत असेही सांगितले. बँका या मंजूर करणारे आहेत आणि ग्राहक अर्जदार आहेत, ते देणारे आहेत आणि ग्राहक स्वीकारणारे आहेत अशी भावना बाळगू नये असे आवाहन त्यांनी बँकाना केले. बँकांना भागीदारीचे मॉडेल स्वीकारावे लागेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले.  जन धन योजना लागू करण्यात बँकिंग क्षेत्राने दाखवलेल्या उत्साहाबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

पंतप्रधान म्हणाले की सर्व भागधारकांची  वाढ व्हावी असे बँकाना वाटले पाहिजे आणि या यशोगाथेत त्यांनी सक्रियपणे सहभागी झाले पाहिजे.  त्यांनी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचे (पीएलआयचे) उदाहरण दिले जेथे भारतीय उत्पादकांना उत्पादनावर प्रोत्साहन देऊन सरकार तेच करत आहे.

उत्पादन आधारित प्रोत्साहन योजने अंतर्गत उत्पादकांना त्यांची क्षमता अनेक पटींनी वाढवण्यासाठी आणि जागतिक कंपन्यांमध्ये स्वतःचे रूपांतर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.  बँका आपला पाठिंबा देत आणि कौशल्याद्वारे प्रकल्पांना व्यवहार्य बनवण्यात मोठी भूमिका बजावू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.

देशात झालेले मोठे बदल आणि  अंमलबजावणी झालेल्या योजनांमुळे,  देशात माहितीचा (डेटाचा) मोठा पूल तयार झाला आहे.  बँकिंग क्षेत्राने याचा फायदा घेतला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी, पंतप्रधान आवास योजना, स्वामीत्व आणि स्वनिधी यांसारख्या प्रमुख योजनांद्वारे सादर केलेल्या संधींचा उल्लेख केला आणि बँकांना या योजनांमध्ये सहभागी होण्यास आणि त्यांची भूमिका बजावण्यास सांगितले.

आर्थिक समावेशनाच्या एकूण परिणामावर बोलताना श्री मोदी म्हणाले की, देश आर्थिक समावेशनासाठी खूप मेहनत घेत आहे, तेव्हा नागरिकांच्या उत्पादक क्षमतेला खुले करणे त्याला वाव देणे खूप महत्त्वाचे आहे.  त्यांनी बँकिंग क्षेत्राच्या अलीकडील संशोधनाचे उदाहरण दिले. तिथे अधिक जन धन खाती उघडल्यामुळे राज्यांमधे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे.

त्याचप्रमाणे आज कॉर्पोरेट्स आणि नवउद्यम (स्टार्ट अप) ज्या प्रमाणात पुढे येत आहेत ते अभूतपूर्व असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “अशा परिस्थितीत, भारताच्या आकांक्षांना बळ देण्यासाठी, निधी देण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ कोणती असू शकते?”, असा सवाल पंतप्रधानांनी केला.

पंतप्रधानांनी, बँकिंग क्षेत्राला राष्ट्रीय उद्दिष्टे आणि आश्वासने यांच्याशी जोडून घेत  पुढे जाण्याचे आवाहन केले.  मंत्रालये आणि बँकांना एकत्र आणण्यासाठी वेब आधारित प्रोजेक्ट फंडिंग ट्रॅकरच्या प्रस्तावित पुढाकाराची त्यांनी प्रशंसा केली. गतिशक्ती पोर्टलला इंटरफेस म्हणून जोडल्यास अधिक चांगले होईल, असे त्यांनी सुचवले. स्वातंत्र्याच्या ‘अमृत काला’मध्ये भारतीय बँकिंग क्षेत्र व्यापक विचारसरणीने आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोनातून पुढे जावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.