सशस्त्र दलांमध्ये प्रतिनिधित्वासह सर्व क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी सरकारने पावले उचलली -संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली ,१७ नोव्हेंबर/प्रतिनिधी:- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 17 नोव्हेंबर 2021 रोजी झाशी येथे तीन दिवसीय ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ चे उद्घाटन केले. 19 नोव्हेंबर रोजी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीदिनी या उत्सवाची सांगता होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर 2021 रोजी झाशी किल्ल्याच्या परिसरात आयोजित एका भव्य समारंभात संरक्षण मंत्रालयाच्या विविध नवीन उपक्रमांचे लोकार्पण/उदघाटन करतील.

उद्घाटन समारंभात बोलताना राजनाथ सिंह यांनी हा महोत्सव केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वय आणि दृढ निर्धाराचे उदाहरण असल्याचे सांगितले. राष्ट्राच्या  सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान  देणाऱ्या सर्व शूरवीरांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि या कार्यक्रमात संघर्ष, बलिदान आणि विजयाची झलक पाहायला मिळेल असे सांगितले. त्यांनी राणी लक्ष्मीबाई यांचेही स्मरण केले,  शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असा त्यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, सशस्त्र दलांमध्ये प्रतिनिधित्वासह सर्व क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी सरकारने प्रमुख  पावले उचलली आहेत.

संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णतेचे महत्त्व अधोरेखित करताना राजनाथ सिंह म्हणाले, भारत इतर देशांवर अवलंबून राहून आपल्या सामरिक  आणि सुरक्षा विषयक गरजा पूर्ण करू शकत नाही आणि पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘आत्मनिर्भर भारत’ साध्य करण्यासाठी सरकार निरंतर  प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. आयुध निर्माण कारखान्याच्या बोर्डाचे कॉर्पोरेटायझेशन, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये संरक्षण कॉरिडॉरची स्थापना; थेट परकीय गुंतवणुकीत वाढ; संरक्षण उत्पादन आणि निर्यात प्रोत्साहन धोरण 2020 चा मसुदा यासह संरक्षण क्षेत्रातील संरचनात्मक आणि संघटनात्मक सुधारणा त्यांनी विशद केल्या. यामुळे  केवळ देशाची ताकद वाढणार नाही तर भविष्यासाठी भारतीय संरक्षण उत्पादनासाठी एक रूपरेषा  देखील प्रदान करेल असा  विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संरक्षण मंत्र्यांनी ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या सरकारच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला आणि पंतप्रधानांचे स्वप्न लवकरच साकार करण्याचा विश्वास व्यक्त केला.