शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड : राज्यातील शेती आणि शेतकरी यांची स्थिती सुधारण्यासाठी नैसर्गिक हवामानासह त्यांना चांगल्या बियाणांची आणि उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. यासाठी शासन कटिबद्ध असून वेळोवेळी शेतकऱ्यांसमोरील जी काही आव्हाने येतात त्यातून सावरण्यासाठी शासन प्रयत्नशील राहिले आहे, असे सांगून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कृषी दिनानिमित्त शेतकरी बांधवांना चांगल्या खरीप हंगामाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. राज्यातील शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन १ जुलै या त्यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने शासनातर्फे कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यालयीन पातळीवर हा दिवस साजरा होण्यासमवेतच तो शेतकऱ्यांच्या समवेत बांधा-बांधावर साजरा व्हावा अशा सदिच्छा त्यांनी दिल्या.

यावर्षी मागील चार महिन्यांच्या कालावधीत सर्वांसोबत कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांनाही खूप काही सोसावे लागले आहे. या आव्हानात्मक काळात शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पूर्व तयारी केली. काही शेतकऱ्यांनी इतर पिकांसमवेत सोयाबिनची लागवड केली. यातील काही शेतकऱ्यांचे सोयाबिन उगवू न शकल्याने मोठे नुकसान झाले. यासाठी चौकशी सुरु असून दोषी कंपनीविरुद्ध लवकरच कारवाई करु, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून या कृषी दिनापासून शेतकरी बांधवांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *