गंगापूर उपजिल्हा रूग्णालयाला मिळाली रूग्णवाहिका

आ.सतीश चव्हाण यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता

गंगापूर,१६ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून गंगापूर येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयास रूग्णवाहिका देण्यात आली असून आज (दि.16) आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून या रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप कुलकर्णी यांच्याकडे आ.सतीश चव्हाण यांनी रूग्णवाहिकेची चावी सुपूर्द केली.

Image

कोवीड-19 विषाणुमुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तसेच जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने 16 एप्रिल 2021 रोजी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना सन 2021-22 या आर्थिक वर्षात रू. 1 कोटी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. आ.सतीश चव्हाण यांचा मतदारसंघ हा संपूर्ण मराठवाडा असल्याने कोवीड-19 च्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेला निधी त्यांनी मराठवाड्यातील विविध शासकीय रूग्णालयांना यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी दिला आहे. मे महिन्यात आ.सतीश चव्हाण यांनी गंगापूर येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयास भेट दिली असता याठिकाणी रूग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असून रूग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील डॉक्टरांनी आ.सतीश चव्हाण यांच्याकडे केली होती. आ.सतीश चव्हाण यांनी त्यावेळी रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आ.सतीश चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनाची आज पूर्तता केली.

Image

रूग्णवाहिकेअभावी कुणालाही प्राण गमवावा लागू नये यासाठी मी माझ्या आमदार निधीतून गंगापूर येथील उपजिल्हा रूग्णालयासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. गंगापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही रूग्णवाहिका उपलब्ध राहणार असून रूग्णांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास या रूग्णवाहिकेची नक्कीच मदत होईल असा विश्वास आ.सतीश चव्हाण यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस  कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, तालुकाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर नीळ, राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, औरंगाबादचे अध्यक्ष संतोष माने, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, फैसल चाऊस, नगरसेवक सुरेश नेमाडे, ज्ञानेश्वर साबणे, योगेश पाटील, वाल्मिक शिरसाठ, वैद्यकीय अधिक्षक डॉ.रमेश पवार आदींची उपस्थिती होती.