पालकमंत्र्यांची व्यापारी बांधवांशी चर्चा; सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मरावती,,१६ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- अमरावती शहरात शांतता निर्माण झाली असून, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 2 ते 4 वाजेदरम्यान खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न पोलीस व प्रशासनाकडून सातत्याने होत असून, लवकरच सर्व व्यवहार सुरळीत होतील, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.

शहरातील स्थितीच्या अनुषंगाने चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंटस् अँड इंडस्ट्रीज संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, संघटनेचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्याम राठी, अतुल कळमकर, गौरीशंकर हेडा, मगनभाई बांठिया, राजेंद्र भन्साली, अनिल खरपे, बकुल कक्कड, ओमप्रकाश चांडक, संतोष बल्दुआ, संजय चोपडा, मोरंदमल बुधवाणी, आशुतोष वाडेकर, शरणपालसिंह अरोरा, सुरेंद्र पोपली, संजय कुकरेजा, पप्पू गगलाणी, मनोज खंडेलवाल, गोविंद सोमाणी, महेश पिंजाणी, सुरेश केवलरामाणी, अर्जुन चांदवाणी, रंजन महाजन, अशोक राठी आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी व्यापारी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानुसार सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी संचारबंदीत क्रमाक्रमाने  शिथीलता आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली की व्यापार क्षेत्रासह सर्वच घटकांचे नुकसान होते. गत दोन दिवसांत सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शांतता निर्माण झाली. जनजीवन पूर्वपदावर येऊन सर्व व्यवहार, सोयीसुविधा पूर्ववत सुरू व्हाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास दोन तासांची शिथीलता आणण्यात आली आहे. त्यानंतरही इतर सेवाही पूर्ववत करण्यात येत आहेत. व्यापारी बांधव, विविध क्षेत्रांतील नागरिक यांच्या माहितीसाठी प्रशासनाकडून होणा-या निर्णयांची माहिती पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे प्रसारित केली जाईल.