“असा अलौकिक शिवआराधक होणे नाही.. शिवशाहीर शिव चरणी लीन…!”– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांकडून तीव्र शोक व्यक्त

पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केले आहे. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोकही व्यक्त केला आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, काही महिन्यांपूर्वीच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शंभरीत पदार्पणानिमित्त अभिष्टचिंतनाचा योग आला होता. त्यावेळीही बाबासाहेबांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे. त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले. जिथे-जिथे महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोहचले. त्यांनी संदर्भ, माहिती गोळा केली, अभ्यास-संशोधन केले आणि तितक्याच तन्मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभर पोहचविला. घरा-घरात शिवभक्त निर्माण व्हावेत आणि या शिवभक्तांना त्यांच्या आराध्याच्या तेजःपुंज पैलूंचे दर्शन घडवावे, यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानले. दिगंतरात विलीन झाल्यावरही ते तिथेही शिवराय चरणी लीन होतील. शिवमहिमा, शिवरायांच्या दिगंत किर्तीची कवने लिहिण्यात आणि ती तडफदार आवाजात, आवेशात पोहचवण्यासाठी दंग होतील. पुरंदरेवाडा हा अनेकांसाठी अनेक अर्थांनी आधार होता. हा आधारवड त्यांच्या निधनामुळे अंतर्धान पावला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषीतुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव भासत राहील. शिवचरित्राच्या अखंड पारायणालाच आयुष्य मानणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो अशी जगदंबा चरणी प्रार्थना. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने तेजस्वी शिवतारा निखळला – राज्यपालांची शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने तेजस्वी शिवतारा निखळला – राज्यपालांची शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

लोककल्याणकारी छत्रपती शिवरायांचे चरित्र आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत जागविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे उत्तुंग प्रतिभेचे अलौकिक व्यक्तित्व होते. त्यांचे भावविश्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारावले होते. त्यांच्या प्रत्येक श्वासात महाराजांचा ध्यास होता. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या लिखाणातून, व्याख्यानांमधून तसेच ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्यामधून त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे पुण्यकार्य केले.

अलिकडेच शिवसृष्टी येथे भेट दिली असता व त्यानंतर एका पुरस्कार सोहळ्यासाठी ते राजभवन येथे आले असताना त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे भाग्य लाभले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने भारतवर्षाच्या आसमंतातील एक तेजस्वी शिवतारा निखळला आहे. त्यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी साकारणे व शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वदूर पोहोचविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

महाराष्ट्रात येऊन शिवशाहीर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे व त्यांचा स्नेह आपणांस मिळणे ही आपली जीवनातली एक मोठी उपलब्धी आहे असे आपण मानतो. त्यामुळे त्यांचे निधन हे आपल्याकरिता वैयक्तिक स्तरावर देखील दुःखदायक आहे.  या दुःखद प्रसंगी आपल्या तीव्र शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्या चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची  हानी; एक अध्याय पडद्याआड – उपमुख्यमंत्री अजित पवार

“ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.”  अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

थोर इतिहासकार, पद्मविभूषण,  महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिवंगत पुरंदरे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांची आराधना करण्यासाठी वाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी केलेला अभ्यास, संशोधन, संदर्भ हे आपणासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘ जाणता राजा ‘ या महानाट्याच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वाचा वाटा  दिला असून त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.

गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धाजंली

थोर इतिहासकार, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे व्रतस्थ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले आहे. छत्रपती शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचे स्फुल्लिंग महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या राष्ट्रभक्तीची ज्योत मनामनात चेतवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी सांस्कृतिक हानी झाली आहे. “बाबासाहेब पुरंदरे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.” अशा शब्दांत गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.