शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे- शिवचरित्राच्या साधनेसाठी आयुष्य वेचणारा तपस्वी

किशोर शितोळे

माझं कॉलेज जीवन संपलं आणि कलाक्षेत्राच्या आसक्तीनं, ओढीनं मी पुण्यात काही काळ राहण्याचं ठरवलं आणि आदरणीय श्री. बिंदू माधव जोशी यांच्या मार्गदर्शनात चालणाऱ्या “परंपरा महाराष्ट्राची” या प्रसिद्ध कलापथकात काम करायची संधी मला मिळाली … पुणे, ठाणे, मुंबई अश्या अनेक शहरात प्रयोगाच्या निमित्ताने प्रवास झाला….पराग ठाकूर, राजेश गोवंडे, डॉ. लोहकरे, जयश्री, वाळवेकर, मंदार परळीकर असे छान कलाकार मित्र लाभले.

त्याच काळात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या “जाणता राजा” या लोकप्रिय, भव्यदिव्य महानाट्याच्या तालमी विश्रामबाग वाड्यात सुरु झाल्या होत्या आणि माझं भाग्य की मला या नाट्यात काम करायला मिळालं…

आदरणीय बाबासाहेब अत्यंत शिस्तकठोर होते…तालीम रात्री 8 म्हणजे 8 वाजता सुरू व्हायचीच, 100- 150 कलाकार असायचे, पण एकही मिनिटं कोणी उशीर केला तर ….बाबासाहेबांच्या समोर जाण्याचं कोणाचं धाडस नसायचं…

आ. बाबासाहेब स्वतः प्रत्येक प्रसंगाची तालीम घ्यायचे….ज्योवर तो प्रसंग त्यांना पाहीजे तसा होत नाही तोवर ते अत्यंत अस्वस्थ असायचे…

प्रयोग सुरू झाले, मला 3- 4वेगवेगळ्या भूमिका मिळाल्या होत्या…. पण काही प्रयोगांमध्ये आ. बाबांनी माझे काम पाहिले आणि मला एक दिवशी शाहीरी फडात काम करण्याचा निरोप दिला….तो क्षण माझ्यासाठी अत्यंत भाग्याचा क्षण होता….कारण या महानाट्यात कलाकाराला “शाहीरी फडात” काम करायला मिळणं म्हणजे अत्यंत गौरवास्पद समजलं जायचं, कारण “जाणता राजा” च सर्व कथानक हा शाहीर व 7-8 सहकारी आपल्या शाहिरीतून गात, जोशपूर्ण नाचत मांडत असतो…ते शिवकवन मांडताना अत्यंत ऊर्जा घेऊन शाहीरी नृत्यातून ही प्रभावी मांडणी होत असते….सतत तीन तास वेगवान, जोशपूर्ण हालचाली करीत सगळं नाट्य, शिवपराक्रमाची गाथा मांडणं हे शाहीरी फडावर सगळं अवलंबून असायचं….

त्यामुळे आ. बाबांचं या शाहीरी फडावर विशेष प्रेम व लक्ष असायचं….आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे आम्हा सर्व शाहिरांना आ. बाबा प्रत्येक प्रयोगाला आम्ही शाहीरी गणवेश घालून, मेकअप झाल्यावर तयार होतांना स्वतःच्या हाताने फेटा बांधायचे….great ना….मलाही बांधायचे…पण मला फेटा बांधल्यावर स्वतः बाबासाहेब मुजरा घालायचे….उत्तरादाखल मीही त्यांना घालायचो…..मला वाटायचं बाबा तसे खूप खोडकर आणि मिश्किलही होते…मूड मध्ये असले की लहान थोर कलाकारांच्या फिरक्या घ्यायचे….तर असेल त्याचा वाटले…..पण 2- 3 प्रयोगानंतर मी न राहवून बाबांना म्हणालो…”बाबा नका आपण मला असा मुजरा करीत जाऊ ….संकोच वाटतो”….तसं ते उत्तरले… “किशोरराव, आपण सरदार शितोळे…शिवछत्रपतींचे सरदार, शिवछत्रपतींच्या सोबत आपल्या पूर्वजांनी भगवा खांद्यावर घेऊन स्वराज्य उभारणीत मोलाचं कार्य साधलेलं, त्या सरदार शितोळ्यांना हा आमचा मानाचा मुजरा….” ……बापरे…आदरणीय बाबासाहेबांची शिवछत्रपतींच्या वरील ही निस्सीम निष्ठा पाहून मी स्तिमित झालो….एवढं मोठं व्यक्तिमत्त्व पण किती हे थोर वागणं…….भारावून जावं असंच सर्व काही…

मध्ये संभाजीनगरला आले तेव्हा आवर्जून घरी येऊन गेले…

पुणे, सोलापूर, संभाजीनगर इथल्या प्रयोगांमध्ये मला काम करायला मिळाले, संभाजीनगरात तर माझ्या दोन्ही बहिणींनी पण काम केले….

सोलापूरला “जाणता राजाचे” प्रयोगाला गेलो असताना, आ. बाबासाहेबांसोबत आम्ही सगळे कलाकार नळदुर्गचा किल्ला पाहायला गेलो होतो….खरोखरचं बाबांसोबत किल्ला पाहणं एक पर्वणीच होती…. त्या किल्लावरचं एक एक ठिकाण आणि त्याचं ऐतिहासिक महात्म्य अगदी तपशीलवार बाबा असं काही वर्णन करीत की साक्षात तो शेकडो वर्षांपूर्वीचा काळ जणू त्यांच्या अभ्यासपूर्ण वाणीनं उभा करीत…..

मध्यंतरी 10-15 वर्ष माझा बाबांचा संपर्क होऊ शकला नव्हता….एकदा सहपरिवार आम्ही पर्वतीला बाबांना भेटायला घरी गेलो, बाबासाहेब खूप थकले होते, विस्मरण ही खूप होई….शक्यतो कोणाला भेटत नसत…मीही ओळखतील की नाही म्हणून साशंक होतो….पण त्यांनी चक्क नावासह ओळखले….सरदार शितोळे घराण्याचा सगळा इतिहास अगदी धाडधाड सांगितला…. पत्नी, दोन्ही मुलं आम्ही अगदी मंत्र मुग्ध होऊन ऐकत होतो….

मागच्या वर्षीची गोष्ट आहे, आमचा भाचा निखीलचं लग्न पुण्यात होतं, तो म्हणाला “मामा, माझ्या लग्नाला बाबासाहेबांनी आशिर्वाद द्यायला यावं अशी माझी मनोमन ईच्छा आहे”…..मी म्हटलं “अरे त्यांचं वय वर्ष 98….ते आता खूप थकले असतील, आणि आपण बोलावणं ही योग्य नाही आणि त्यांचे कुटुंबीय ही परवानगी देणार नाहीत ….आणि मुख्य म्हणजे ते आता मला ओळखणारही नाहीत, पण तुझी इच्छाच आहे तर पत्रिका तर देऊन ये”….

आणि तो बाबांना भेटायला गेला, त्याने माझा संदर्भ दिला आणि येण्याची विनंती केली…..आणि चक्क बाबांनी … “हो हो का नाही….आम्ही अवश्य जातीनं हजर राहूत” ….माझा तर विश्वासच बसत नव्हता….भाचा निखिलला आभाळ ठेंगणं झालं होतं….तरीही मला ते लग्नाला येतीलच याची शंकाच वाटत होती. कारण त्यांना चार पावलंही चालणं अवघड जात होतं.

लग्न मुहूर्त पत्रिकेत संध्याकाळी 5 वाजताचा …मे महिन्याचं कडक ऊन होतं, पण उन्हामुळे लग्न 6 वाजता लावायची योजना होती….आणि 5 ला 5 मिनिटं कमी असतांना 2-3 जण पळत माझ्याकडे निरोप घेऊन आले की बाहेर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आलेत.

बापरे …माझा तर विश्वासच बसेना…अजून लग्नाचे पाहुणे नव्हते, 1 तास वेळ होता…आणि बाबा तर त्यांच्या शिरस्त्या नुसार अगदी वेळेवर आले होते.. मी धावत बाहेर गेलो, बाबा गाडीत बसून होते, वंदन केले…त्यांना आमची परिस्थिती लक्षात आली होती, तेच म्हणाले, “होऊद्या तुमची तयारी सावकाश, मी गाडीत बसतो”….त्यांना चालतानाही दोघांनी धरावं लागायचं….
अन अश्या स्थितीत बाबांना 1 तास गाडीत बसवून ठेवणंही योग्य नव्हतं, आणि लोकांना ते आलेत कळलं तर भेटणारे, फोटो काढणारे मागे लागतील, ही गर्दीही टाळायची होती….बाबांना विनंती करून एका खोलीत विश्रांतीची व्यवस्था केली…

6 वाजता लग्नाची तयारी केली….अँकरिंग करायला मीच माईक हातात घेतला आणि म्हणालो…”आज आपणां सर्वांचं अहोभाग्य की, आज वधूवराला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या मध्ये स्वतः शिवशाहीर आदरणीय बाबासाहेब पुरंदरे येत आहेत…..” असं मी म्हणताच हजारो वऱ्हाडी, पाहुणे मंडळी उस्फूर्तपणे बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी, पाहण्यासाठी आदराने उभी राहिली …..आणि…आम्ही केलेल्या व्यवस्थेनुसार… सन्मानपूर्वक अगदी इतिहासकाळा प्रमाणे आदरणीय बाबासाहेबांना झेंडेकरी, झालकरी यांच्या सोबत सनई चौघड्याच्या सोबतीनं साग्रसंगीत मिरवणूक काढीत स्टेज समोर आणले….सर्वत्र अखंड व उस्फूर्त जयजयकार सुरू होता…”छत्रपती शिवाजी महाराज की जय….” कित्ती कित्ती हे प्रेम आदरणीय बाबासाहेबांवर आबालवृद्ध करतात….सर्व दृश्य विलक्षण रोमांचकारी होते….बाबा म्हणजे आकर्षक व्यक्तिमत्त्व.. तेजपुंज चेहरा, ती भारदस्त दाढी, काळा रुबाबदार सूट, आजही तोच नीटनेटकेपणा…
आ. बाबांना पहिल्या रांगेत आणून बसवलं, अक्षता झाल्या, वधुवर निखिल आणि प्रियंका स्टेजवरून खाली आले, बाबासाहेबांनी प्रेमानं, मायेनं दोघांना जवळ घेतलं….आशीर्वाद दिले, आणि चक्क माईक हातात धरून सरदार निगडे व सरदार बालगुडे परिवारासह सर्वांना संबोधले…. वय वर्ष 98 चा हा तरुण….कोठून आली असेल ही ऊर्जा…..आणि याचं उत्तर केवळ एकच…..या उर्जेचं मूळ म्हणजे, आयुष्याचा क्षण न क्षण वेचला शिवछत्रपतींच्या साधनेत……स्वराज्यासाठी छत्रपतींच्या शब्दावर जीव द्यायला तयार होणारी माणसं निर्माण करणाऱ्या त्या शिवरायांचा अभ्यास करण्यानं आलेली ही ऊर्जा होती.

आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत पण त्यांच्या भारावलेल्या आठवणी आयुष्यभर साथ देतील.

भावपूर्ण श्रद्धांजली