नक्षल चकमकीत सहभागी सी-६० जवान, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गृहमंत्र्यांकडून अभिनंदन

गडचिरोली,१५ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-  शनिवारी गडचिरोली- छत्तीसगढच्या सीमेवर धानोरा तालुक्यात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सी-60 जवानांकडून 26 नक्षल मारले गेले. याबाबत त्यांचे अभिनंदन करणेकरीता व त्याबाबत माहिती देण्याकरीता आज पोलीस विभागामार्फत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सी-60 जवानांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सी-60 जवानांसह इतर सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेही अभिनंदन केले.

Image

यावेळी ते म्हणाले, यापूर्वीही पोलीस विभागाकडून मोठ्या प्रमाणात नक्षल्यांना रोखण्यात पोलिस विभागाला यश आले असून या विभागाकडून राज्यात शांतता निर्माण करण्यामध्ये पोलीसांची मोठी भूमिका आहे. पोलीसांनी केलेलं नियोजन तसेच उपाय योजनांमुळेच जिल्ह्यात शांतता निर्माण होण्यास मदत होत आहे. या भेटीत त्यांनी यापूर्वी शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींची भेट घेतली व त्यांनी दिलेली निवेदने स्वीकारून अनुकंपा मधील भरती तसेच त्यांच्या इतर मागण्या मान्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन या मागण्या शासन दरबारी घेऊन त्या मान्य होण्याकरीता आपण प्रयत्न करणार असे आश्वासन त्यांना दिले.

पोलीस विभागाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

यावेळी आयोजित सी-60 जवानांचे अभिनंदन कार्यक्रमात सहभागी होताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थितांचे अभिनंदन केले. यावेळी मंचावर अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषण कुमार उपाध्याय, पोलीस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान), नागपूर छेरिंग दोरजे, पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र संदिप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे  उपस्थित होते.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की बंदुकीच्या जोरावर जर कोणी अशातंता निर्माण करीत असेल तर त्याचा बिमोड करण्यात येईल आणि ही जबाबदारी आपण यशस्विरीत्या पार पाडतच आहोत. जवान मोठया खडतर परिस्थितीत  काम करत असतात. त्यांचे प्रश्न आपण शासन दरबारी मांडणार व ते पूर्ण करण्याचे प्रयत्नही करणार असेही ते यावेळी म्हणाले. स्थानिक युवकांना पोलीस विभागात प्राधान्य दिल्यास इथे रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच ते येथील स्थानिक असल्यामुळे त्यांना येथील परिस्थिती माहिती असेल, त्यामुळे नक्षलवाद कमी होण्यास मदत होईल. यावेळी त्यांनी अनुकंपा मधील तसेच इतर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. शासन सहानुभूतिपूर्वक या सर्वांचा विचार करेल असेही ते यावेळी म्हणाले. वित्त विभागाची मंजूरी मिळाल्यानंतर लवकरच शासन याबाबत निर्णय घेईल. इथे येऊन व सर्वांना भेटून मला खूप आनंद  झाला अशा त्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. यावेळी संदीप पाटील यांनी सांगितले की, देशात सर्वात जास्त शौर्य पदक मिळाले असतील तर ते सी-60 जवानांना. सी-60 जवानांची कामगिरी कौतुकास्पद आहे. यावेळी त्यांनीही पोलीस विभागाचे अभिनंदन केले. यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.

गडचिरोली पोलिस मुख्यालयात पोहचताच गृहमंत्र्यांनी शहीद स्तंभावर आदरांजली वाहिली. त्यानंतर पोलिसांशी संवाद साधत त्यांनी जवानांच्या उल्लेखनीय कामगिरीचे व धाडसाचे कौतुक केले. कुख्यात मिलिंद तेलतुंबडे मृत झाल्याने तीन राज्यांना फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

तीन राज्यातील नक्षल चळवळ कमकुवत करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी सर्वोत्तम कामगिरी केल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. आगामी काळातही या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी गडचिरोली पोलिस सर्वतोपरी योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नक्षलविरोधी कामगिरी बजावणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहणार असून त्यांच्या मागण्यांची शासन दखल घेणार असल्याची ग्वाही गृहमंत्र्यांनी आपल्या संबोधनादरम्यान दिली.