युवा इतिहासकारांनी बाबासाहेब पुरंदरेंसारखीच गुणवत्ता कायम ठेवावी : पंतप्रधान

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी दिला होता  संदेश

पुणे ,१५ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेजी यांनी त्यांच्या आयुष्याच्या 100 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले होते.१३ ऑगस्ट रोजी आभासी पद्धतीने  बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त आयोजित समारंभात बोलताना पंतप्रधान म्हणाले की,  बाबासाहेब पुरंदरे यांचे जीवन हे आपल्या ऋषीमूनींनी स्पष्ट केलेल्या सक्रिय आणि मानसिकदृष्ट्या दक्ष जीवनाचे  उदाहरण आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात त्यांचे शंभराव्या वर्षात पदार्पण हा आनंददायी  योगायोग असल्याचे त्यांनी नमूद केले होते .

बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या इतिहासात अमर झालेल्या व्यक्तींचा इतिहास लिहून दिलेले योगदान पंतप्रधानांनी अधोरेखित केले होते . पंतप्रधान म्हणाले की, ”शिवाजी महाराजांचे जीवन आणि इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी आपण सर्वजण त्यांचे सदैव ऋणी राहू” .श्री पुरंदरे यांना 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे, तत्कालीन महाराष्ट्र शासनाने  2015 मध्ये त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव केला होता.मध्य प्रदेश सरकारने त्यांना कालिदास पुरस्कार देऊन मानवंदना दिली.

शिवाजी महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वावर भरभरून बोलताना पंतप्रधान  म्हणाले होते की, शिवाजी महाराज हे केवळ भारतीय इतिहासामधील एक मोठी व्यक्तीच  नाही तर  त्यांचा सध्याच्या भारतीय भूगोलावरही प्रभाव आहे. जर शिवाजी महाराज नसते तर आपली काय अवस्था झाली असती हा आपल्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळासमोरील  मोठा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय भारताचे स्वरूप, भारताचे  वैभव याची कल्पना करणे अशक्य आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात  काळात जे कार्य केले, तेच कार्य त्यांच्यानंतर त्यांच्यावर लिहिलेल्या गाथा , प्रेरणा आणि कथांनी केले आहे.  त्यांचे ‘हिंदवी स्वराज्य ’ हे मागास आणि वंचितांना न्याय देण्याचे आणि जुलूमाविरोधातील लढ्याचे  अतुलनीय उदाहरण आहे. वीर शिवाजींचे व्यवस्थापन, नौदल शक्तीचा वापर, त्यांचे जल व्यवस्थापन अजूनही अनुकरणीय  आहे, असे श्री मोदी म्हणाले होते .

बाबासाहेब पुरंदरे यांची शिवाजी महाराजांबद्दल असलेली अतूट भक्ती, त्यांच्या कार्यातून प्रतिबिंबित होते. त्यांचे कार्य  शिवाजी महाराजांना  आपल्या हृदयात साक्षात जिवंत करते ,असे पंतप्रधान म्हणाले होते . बाबासाहेबांच्या कार्यक्रमांना वैयक्तिकरित्या उपस्थित राहिलेल्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला होता . आणि तरुणांपर्यंत संपूर्ण वैभवशाली आणि प्रेरणादायी इतिहास पोहोचवण्याच्या पुरंदरे यांच्या उत्साहाची प्रशंसा केली होती . पंतप्रधान म्हणाले की, इतिहास त्याच्या खऱ्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवावा याकडे त्यांनी कायमच लक्ष दिले. देशाच्या इतिहासासाठी हे संतुलन आवश्यक आहे, त्यांची श्रद्धा आणि त्यांच्यातील साहित्यिकाने कधीही त्यांच्या इतिहासाच्या जाणिवांवर  परिणाम होऊ दिला नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी युवा इतिहासकारांना आवाहन करतो की, जेव्हा ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास लिहितील तेव्हा त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंसारखीच गुणवत्ता कायम ठेवावी , असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी गोवा मुक्ती संग्रामपासून ते दादरा  नगर हवेली स्वातंत्र्य संग्रामातील बाबासाहेब पुरंदरे यांच्या योगदानाचे स्मरण केले होते .

शताब्दीत पदार्पणाबद्दल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा गौरव

शिवछत्रपतींच्या चरित्राचा गेली सुमारे नऊ दशके सखोल अभ्यास करणारे आणि राज्यासह देश-विदेशातील साडेसहा दशकांतील पिढ्यांना शिवछत्रपतींच्या दैदिप्यमान चरित्राची सखोल ओळख करून देणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी  शताब्दीत पदार्पण केले होते  . त्याबद्दल या शिवसाधकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवर आणि समस्त पुणेकरांतर्फे हृद्य सन्मान करण्यात आला होता . 

शतकवीर पद्मविभुषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्कार समारोह समितीने हा कार्यक्रम आयोजिला होता. आंबेगावमधील शिवसृष्टीतील सरकार वाड्यात झालेल्या या समारंभास समितीच्या अध्यक्षा आणि लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, आमदार मुक्ता टिळक, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि  विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आभासी पद्धतीने या कार्यक्रत सहभागी झाले होते.

जगदीश कदम यांनी प्रास्ताविक करून शिवसृष्टीविषयक माहिती दिली.

शिवछत्रपती हा पुरंदरे यांचा ध्यास आहे. त्या ध्यासात, प्रेरणेत राष्ट्रभक्ती आहे. घरोघरी शिवाजी महाराजांचा सविस्तर परिचय करून देतानाच पुरंदरे यांनी गेल्या सहा दशकांतील पिढ्यांना जीवनाचे पाथेय दिले आहे, अशा शब्दांत डॉ. मोहन भागवत यांनी पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव केला होता . शाळेत इतिहासाच्या तासाला शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगत. घरीही वडील त्या गोष्टी सांगत. त्यावेळी बाबासाहेबांकडून ही गोष्ट ऐकल्याचे ते सांगत.

शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मला क्रिकेटमध्येही प्रेरणा मिळाली आहे. लढण्याचे बळ, स्फूर्ती या चरित्रातून मिळाली. एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन सलग नव्वद वर्षे त्याचा सखोल अभ्यास करणे, ही कठीण गोष्ट आहे. परंतु, बाबासाहेबांनी हा आदर्शही आपल्या कार्यातून उभा केला आहे, अशा भावना सचिन तेंडूलकर याने  व्यक्त केल्या होत्या . क्रिकेटमुळे मला जाणता राजा हे महानाट्य पाहता आले नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली होती .

आमच्या सरकारच्या काळात आंबेगावमध्ये शिवसृष्टीचा प्रकल्प मंजूर केला गेला. मेगा टुरिझमचा दर्जा मिळालेल्या या शिवसृष्टीत बाबासाहेबांचा शताब्दीनिमित्त गौरव होत आहे, ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या संकल्पनेतील शिवसृष्टीचे काम लवकरच पूर्णत्वास जावो, अशा सदिच्छा फडणवीस यांनी दिल्या होत्या . शिवसृष्टीचे काम होत नाही, तोपर्यंत विश्रांती नाही, हा बाबासाहेबांचा ध्यास आहे. त्यांची ही ध्यासपूर्ती हाच आपला संकल्प असला पाहिजे. या संकल्पपूर्तीसाठी पुढील काळात सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन सुमित्रा महाजन यांनी केले. समाजातील दानशूर व्यक्तींनी आपल्या कमाईतील एक लाखांची रक्कम दिली, तर शिवसृष्टीचे काम वेगाने मार्गी लागेल, अशी सूचना डॉ. सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमादरम्यान मांडली होती. महाजन यांनी ही सूचना उचलून धरत, आपल्या निवृत्तीवेतनातून एक लाखांची रक्कम या कामासाठी देण्याची घोषणा केली.

 मी शताब्दीत पदार्पण केले आहे. माझ्या वाढदिवसाने काय साधणार, याचा हिशेब मांडलेला नाही, असे सांगत पुरंदरे यांनी या सत्काराच्या उत्तरात आपले मनोगत व्यक्त केले होते . माझे परमदैवत असलेल्या शिवछत्रपतींचे स्मारक शिवसृष्टीच्या निमित्ताने उभे राहताना मी पाहतो आहे, ही आनंदाची बाब आहे. शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडून ती पूर्णत्वास नेली. सर्व समाज एक आहे, अभेद्य आहे, हे त्यांनी त्यातून ठसवले. महाराजांचे चरित्र हेच मूर्तिमंत स्वातंत्र्य, स्वराज्य आहे. अशा या महापुरूषाचे, योग्याचे हे स्मारक सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील, असे पुरंदरे म्हणाले.देशाच्या प्रत्येक प्रांतात असे महापुरूष आहेत. आजच्या युवकांना त्यांची ओळख करून देतानाच त्यांना ऊर्जा, प्रेरणा देणारी अशी या सर्व महापुरुषांची अशीच स्मारके देशभरात उभी राहावीत, अशी आशाही पुरंदरे यांनी व्यक्त केली. संत ज्ञानदेवांनी तुऴजाभवानीवर लिहिलेल्या गोंधळाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली होती. विनित कुबेर यांनी आभार मानले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

शिवचरित्राच्या अभ्यासासाठी पुरंदरे यांच्या नावाने शिष्यवृत्ती     

शिवछत्रपतींच्या कार्याचा, चरित्राचा परदेशातही प्रसार करण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाने आयसीसीआरतर्फे शिष्यवृत्ती देण्याची घोषणा डॉ. सहस्रबुद्धे यांनी केली. परदेशी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल. दरवर्षी एका विद्यार्थ्याची त्यासाठी निवड केली जाईल आणि त्याला शिवचरित्राचा अभ्यास व संशोधनासाठी वार्षिक १८ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल, असे डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.