ऑस्ट्रलिया टी २० वर्ल्ड कप चॅम्पियन

ऑस्ट्रेलियाचा  ८ गडी राखून विजय
वॉर्नर – मार्श यांचे दणकेबाज अर्धशतक 

मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू -डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया )

सामनावीर -मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया )

T 20 world Cup Final 2021 | मिचेल मार्श आणि वॉर्नरची अर्धशतकी खेळी, न्यूझीलंडचा 8 विकेट्सने पराभव करत ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन

दुबई :- डावखुरा डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी केलेली अर्धशतकी खेळी व वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडचे ३ बळी  यामुळेच ऑस्ट्रेलियाला पहिला टी २० वर्ल्ड कप जिंकता आला.ही स्पर्धा ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच  जिंकली आहे.   न्यूझीलंडच्या केनने ठोकलेल्या ८५ धावांमुळे ऑस्ट्रेलियासमोर १७३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य  वॉर्नर आणि मार्शच्या अर्धशतकांनी ऑस्ट्रेलियाने सहज पार करत सामन्यासह स्पर्धांही जिंकली.

Image

तिसऱ्या षटकात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने फिंचला (५) माघारी धाडले. डॅरिल मिशेलने फिंचचा सुंदर झेल घेतला. फिंचनंतर मिचेल मार्श मैदानात आला आहे. तीन षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद १५ धावा केल्या.चौथ्या षटकात अॅडम मिल्नेने १५ धावा दिल्या . चार षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ३० धावा.सहा षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ४३ धावा केल्या. मिल्नेने पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकले. या षटकात ऑस्ट्रेलियाला ३ धावा करता आल्या.फिरकीपटू ईश सोधीने टाकलेल्या सातव्या षटकात ऑस्ट्रेलियाने अर्धशतक पूर्ण केले. सात षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ५० धावा होत्या.नवव्या षटकात वॉर्नर-मार्शने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या षटकात दोघांनी सोधीला १७ धावा कुटल्या. १० षटकात ऑस्ट्रेलियाच्या  १ बाद ८२ धावा होत्या .

Image

वॉर्नर-मार्शने चौकार व षटकारांची बरसात केली. या जोडीने ६ षटकार खेचले आणि सहा चौकार लगावले. ११ व्या षटकांत नीशमच्या  पहिल्या चेंडूवर मार्शने षटकार ठोकला. दुसऱ्या बाजूने फॉर्मात आलेल्या वॉर्नरने चौथ्या चेंडूवर षटकार खेचून आपले अर्धशतक फळ्यावर लावले. त्याने ३४ चेंडूत अर्धशतक साजरे केले.ऑस्ट्रेलियाने १२व्या षटकात आपले शतक पूर्ण केले.  बोल्टने १३व्या षटकात गोलंदाजीला येत ही भागीदारी तोडली. त्याने वॉर्नरची दांडी गुल केली. वॉर्नरने ५३ धावांच्या खेळीत चार चौकार व ३ षटकार मारले.वॉर्नर -मार्श जोडीने ९.५ षटकांत दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागी नोंदवली.   वॉर्नर माघारी परतला असला तरी मार्शने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली.चौदाव्या षटकात मार्शने फिरकी गोलंदाज सोधीला लॉंग ऑनवर षटकार ठोकला. या षटकारामुळे मार्शचे अर्धशतक साजरे केले. त्याने पुल करुन  चौकार  लगावला. मार्शने ३६ चेंडूत ४ चौकार व ४ षटकार लगावून अर्धशतकी खेळी केली.अंतिम सामन्यात कमी चेंडूत अर्धशतक झळकाविणारा मार्श हा पहिला फलंदाज ठरला. त्याने ३१ चेंडूत अर्धशतक केले.  या षटकात सोधीने ३ वाइड चेंडू टाकत १६ धावा दिल्या. १४ षटकात ऑस्ट्रेलियाने २ बाद १२५ धावा .वॉर्नर बाद झाल्यावर मैदानात आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने  मिल्नेच्या तिसऱ्या आणि न्यूझीलंडच्या १५ व्या षटकात दोन खणखणीत चौकार मारले.ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या ५ षटकात ३७ धावांची गरज होती.मॅक्सवेलने आक्रमक खेळत साऊदीच्या षटकात १ चौकार व १ षटकार मारला,या षटकात ऑस्ट्रेलियाला १३ धावा मिळाल्या.ऑस्ट्रेलियाला विजयासाठी  २४ चेंडूत २४ धावा. बोल्ट त्याचे शेवटचे चौथे षटक फेकण्यास आला. मार्शने २ धावा काढून मिडविकेट व लॉंग ऑनच्या शानदार चौकार लगावला.   मार्श व मॅक्सवेल या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी २८ चेंडूत ५३ धावांची भागी केली.मार्शने साउदीला चौकार मारून पाऊण शतक पूर्ण केले. मॅक्सवेलने याच षटकात पाचव्या चेंडूवर रिव्हर्स चौकार लगावून ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मार्शने ५० चेंडूत नाबाद ७७ धावांची नाबाद खेळी केली,त्याने ६ चौकार व ४ षटकार लागले. मॅक्सवेलने धडाकेबाज खेळ करुन नाबाद २८ धावा फटकाविल्या त्या १८ चेंडूत. त्यात चार चौकार व एका षटकाराचा समावेश होता. बोल्टने चार षटकात १८ धावा देऊन फिंच व वॉर्नरला बाद केले. तो न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.     

केन विलियम्सनची वादळी खेळी

Image

ऑस्ट्रेलियाने सुरुवात चांगली केली. पण न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनने ठोकलेल्या ८५ धावांमुळे ऑस्ट्रेलियासमोर १७३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य आहे.न्यूझीलंडने ४ बाद १७२ धावा केल्या. 

ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचं आव्हान होतं. संघाच्या २८ धावा असताना डेरिल मिचेल बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन  मैदानात उतरला. त्यामुळे गडी राखत मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान त्याच्यासमोर होते. त्याने सुरुवातीला संथगतीने खेळत नंतर आक्रमक फटकेबाजी केली. त्यामुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली.

केन विल्यम्सनने ४८ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. या खेळीत १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. १३व्या षटकात विल्यम्सनने आक्रमक पवित्रा धारण करत मॅक्सवेलला दोन षटकार खेचले. याच षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. अंतिम फेरीत ५० हून अधिक धावा करणारा केन विल्यमसन दुसरा कर्णधार आहे. यापूर्वी लॉर्ड मैदानात २००९ च्या वर्ल्डकपमध्ये  कुमार संगकाराने पाकिस्तान विरुद्ध खेळताना नाबाद ६४ धावांची खेळी केली होती.सोळावे षटक  ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने फार महाग ठरले. मिशेल स्टार्चच्या या षटकांत  केनने ४ चौकार आणि एक षटकार ठोकत २२ धावा कुटल्या.कर्णधार काय असतो, हे कायम दाखवून देणाऱ्या केनने आजही अंतिम सामन्यात एकहाती झुंज देत ८५ धावा केल्या. पण अखेर १८ व्या षटकात हेजलवुडने त्याला बाद केले.तत्पूर्वी षटकार ठोकण्यासाठी ओळखला जाणारा ग्लेन फिलीप्स आज अंतिम सामन्यात खास कामगिरी करु शकला नाही. १७ चेंडूत १८ धावा करुन तो बाद झाला आहे. हेजलवुडच्या चेंडूवर मॅक्सवेलने त्याचा झेल पकडला.

न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला १७३ धावांचे आव्हान दिले  आहे. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला १० धावा करता आल्या. २० षटकात न्यूझीलंडने ४ बाद १७२ धावा केल्या. नीशम १३ तर सेफर्ट ८ धावांवर नाबाद राहिले.

Image

ऑस्ट्रेलियासाठी हेझलवूडने १६ धावांत ३ बळी घेतले.हेजलवुडने एकाच षटकात फिलिप्स व केन यांना बाद केले.