होय, अनंतराव विद्यापीठाने घडवले!

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील झुंजार सेनानी ,ध्येयवादी संपादक अनंतराव भालेराव यांच्या कार्यकर्तृत्वाचा सर्वस्पर्शी वेध घेणाऱ्या “कैवल्यज्ञानी पत्रमहर्षी अनंतराव भालेराव स्मरणग्रंथ “(संपादक :प्रवीण बर्दापूरकर )या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी अभंग प्रकाशनतर्फे केले जात आहे त्यानिमित्त अनंतरावांचे सहकारी आणि मराठवाडा दैनिकाचे माजी संपादक विजय निरखी यांचा हा लेख.

विजय निरखी

अनंतराव कधी कधी गोपाळ साक्रीकर किंवा अरविंद वैद्यांना

अग्रलेख लिहिण्यास सांगत.अग्रलेख चांगला झाला, तरी

ते तसे बोलून दाखवत नसत;परंतु इतर ठिकाणी मात्र ते

आजचा अग्रलेख गोपाळ किंवा अरविंदने लिहिला, हे

कौतुकाने सांगत. त्यांच्याकडे भविष्याकडे पाहण्याची एक

वेगळी दृष्टी होती. त्यांच्या कारकिर्दीत मराठवाडा दैनिक

म्हणजे पत्रकार घडविण्याचे एक प्रमुख केंद्र बनले होते.

—-

हैदराबाद संस्थानात असतानामराठवाड्यात पत्रकारिता जवळपास

नव्हतीच. संस्थानचा सर्वेसर्वा असलेल्या निझामाच्या राजवटीत हिंदूंवरील अत्याचारात

दिवसेंदिवस वाढच होत राहिली. त्यातच रझाकारांची फौज निर्माण झाल्यावर हिंदूंना

आजचा दिवस तर गेला उद्याचे काय हा प्रश्‍न रात्रभर सतावत असे. अशा बिकट

परिस्थितीत मराठवाड्यातील काही नेते व कार्यकर्ते निझामशाहीच्या विरोधात दंड

थोपटून उभे राहिले. प्रारंभीच्या काळात ही संख्या फारशी नव्हती, परंतु नंतर ही संख्या

दिवसागणिक वाढतच गेलेली दिसते. याच काळात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या

नेतृत्वाखाली हैदराबाद व मराठवाड्यातील नेते व कार्यकर्ते एकत्र आले. औरंगाबादेत

गोविंदभाई श्रॉफ, आ.कृ. वाघमारे, भाऊसाहेब वैशंपायन, अनंत भालेराव,

मनोहर सोनदे तर मराठवाड्याच्या इतर भागात तेथील नेते व कार्यकर्ते आपापल्या सहकार्‍यांसह लढा देतच राहिले, परंतु या लढ्याची माहिती सर्वदूर पोहचत नव्हती. यातूनच येथे पत्रकारितेचा जन्म झाला असे म्हणता येईल. आनंद कृष्ण वाघमारे यांनी पुढाकार घेऊन ‘मराठवाडा’ नावाचे एक वा दोन पानी पत्र सुरू केले आणि हे पत्रच लढ्याचे

हत्यार बनले. कोठे काय चालले आहे हे कळण्याचे साधन याद्वारे तयार झाले. या पत्रावर निझामाचा रोष होता. पुढे या पत्रावर बंदी आली. त्यामुळे प्रत्येकवेळी हे पत्र वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या नावाने प्रकाशित होऊ लागले. गोविंदभाईनींही संपादक म्हणून काही काळ काम पाहिले. लढ्याची माहिती देणे त्याचबरोबर लोकांना प्रेरणा देण्याचा त्यावेळी या पत्राचा हेतू होता. या पत्रावर बंदी आली, तरी हा प्रवास अखंड चालूच राहिला.

1948च्या सप्टेंबरमध्ये लष्करी कारवाईनंतर निझामाने शरणागती पत्करली आणि मराठवाडा मुक्त झाला. पुढे मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला.

त्याआधी भाषावार प्रांतरचनेनंतर ‘मराठवाडा’ पत्र औरंगाबादेत दाखल झाले.

कालांतराने या पत्राने अर्धसाप्ताहिकाचे रूप घेतले. स्थापनेनंतर आ.कृ.वाघमारे

यांच्या अग्रलेखांतून मराठवाड्यातील प्रश्‍नांना वाचा फुटत होती. लोकांमध्ये

जागृती निर्माण करण्याचे मोठे कार्य वाघमारे यांनी केले. दुर्दैवाने आ.कृ.वाघमारे

यांना पत्रकार घडविण्याची संधी मिळाली नाही. किंबहुना तशी सवडच त्यांना

मिळाली नाही.आ.कृ. वाघमारे, गोविंदभाई आदींसमवेत काम करतानाच अनंत

भालेराव यांच्यातल्या पत्रकाराचा जन्म झाला. वाघमारे यांच्या हयातीतच

‘मराठवाड्या’ची धुरा अनंतरावांकडे आली. पत्रकारितेचे रोपटे आ.कृ.वाघमारे

यांनी लावले असले, तरी त्याला गगनापर्यंत नेण्याचे मोठे कार्य अनंतराव यांनीच

केले. मराठवाडा मुक्त झाल्यामुळे येथील राजकारण, समाजकारण, शैक्षणिक

प्रश्‍न यावर ‘मराठवाडा’ने भर दिला. अनंतराव यांच्याप्रमाणेच विभागातील

मान्यवरांचे लेखही ‘मराठवाड्या’तून प्रसिद्ध होऊ लागले. पत्रकारितेचा व्याप

असा हळूहळू वाढत गेला. अनंतरावांच्या हाताखाली पत्रकारांची पहिली पिढी

तयार झाली. रांजणीकर व त्यांच्या सहकार्‍यांचा त्यात समावेश होता.

‘मराठवाडा’ अर्धसाप्ताहिकाने बाळसे धरले, त्यामुळे विेशस्त मंडळाने

त्याचे दैनिकात रूपांतर करण्याचा विचार केला. त्यावर उलट-सुलट चर्चा

होऊन अखेर 1968 मध्ये हे रूपांतर करण्याचे ठरले. ‘मराठवाडा’ दैनिक म्हणून

प्रसिद्ध होणार ही बातमी सर्वदूर पसरली व तिचे जोरदार व उत्स्फूर्त स्वागत

झाले. दैनिकाची सर्व पूर्वतयारी झाली. पहिला अंक निघणार, त्याच्या आदल्या

दिवशी आ.कृ. वाघमारे यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी आली. दैनिकाच्या

पहिल्याच अंकात संस्थापक वाघमारे यांच्या निधनाचे वृत्त प्रामुख्याने द्यावे

लागले. मराठी वृत्तपत्रसृष्टीत घडलेली ही बहुधा अशी पहिलीच घटना असावी.

1968 मध्ये सुरू झालेल्या दैनिकात अनंतराव यांच्या हाताखाली म.य.

ऊर्फ बाबा दळवी, गोपाळ साक्रीकर, मोठे अरविंद वैद्य, नागनाथ फटाले हे

सहकारी होते. बाबा दळवी हे कार्यकारी संपादक म्हणून रुजू झाले. अनंतराव

यांच्याप्रमाणेच बाबा दळवी यांचे अग्रलेख गाजले. अनंतराव व दळवी यांच्या

नेतृत्वाखाली ‘मराठवाडा’ची वाटचाल जोमात सुरू होती. देशातल्या, जगातल्या

प्रमुख घडामोडी कळाव्यात म्हणून पी.टी. आय. व यू. न्यूज ही बातम्या

देणारी यंत्रणाही मराठवाड्यात आली. सुरुवातीच्या काळात गोपाळ व अरविंद

वैद्य यांच्यावर कामाचा खूप ताण होता हे कोणीही नाकारू शकणार नाही.

1970 नंतर मी, धाकटे अरविंद वैद्य, निशिकांत भालेराव, जयदेव डोळे,

सुभाष वाघोलीकर, व्यंकटेश केसरी वगैरेंचा दैनिकात प्रवेश झाला. याच

सुमारास ‘मराठवाडा’ दैनिक म्हणजे पत्रकार घडविण्याचे एक प्रमुख केंद्र बनले.

मराठवाडा दैनिकात आपणही काम करावे, अशी मनीषा अनेक तरुणांच्या मनात

निर्माण झाली ती याच काळात. काही कारणांमुळे बाबा दळवी यांनी राजीनामा

दिला. त्यामुळे गोपाळ साक्रीकर यांनी त्यांची जागा सांभाळली. संपादक अनंत

भालेराव यांचे व्यक्तिमत्त्व दरारा वाटावा असेच होते. त्यांना भेटायचे म्हणजे

मनात थोडीतरी भीती वाटत असे. परंतु एकदा भेटले की त्यांचे पितृतुल्य प्रेमही

जाणवत असे. अनंतराव यांच्याकडे भविष्याकडे पाहण्याची दृष्टी होती तसेच

आपल्या विभागातील कोणता तरुण मुलगा दैनिकाच्या उपयोगी पडेल, हेही ते

जाणत असत. असे कोणी आढळले, की त्याच्या वडिलास किंवा पालकास

पत्र पाठवून तशी मागणीही ते करीत. मी स्वत: असाच त्यांच्या पत्रामुळे

‘मराठवाडा’त दाखल झालो.

अनंतरावांच्या हाताखाली काम करताना जाणवले ते हे की, त्यांनी कधी

आम्हां कोणासाठी पत्रकारितेचा तास घेतला नाही. परंतु सहकार्‍यांनी केलेल्या

कामातील चुका अचूकपणे दाखवून नेमके काय हवे हे ते स्पष्टपणे सांगत.

पत्रकार घडवण्याचे हे कसब खास त्यांचेच होते. अनंतराव कधी कधी गोपाळ

किंवा अरविंदला अग्रलेख लिहिण्यास सांगत. अग्रलेख चांगला झाला, तरी ते

तसे बोलून दाखवत नसत; परंतु इतर ठिकाणी मात्र ते आजचा अग्रलेख गोपाळ

किंवा अरविंदने लिहिला हे कौतुकाने सांगत. बातम्यांच्या बाबतीही असेच

असायचे. कोणती बातमी किती मोठी करायची, त्या बातमीला कोठे व कसे

स्थान द्यायचे हे त्यांनी काम करणार्‍या सहकार्‍याला कधी सांगितले नाही. परंतु

दुसर्‍या दिवशी सकाळी होणार्‍या बैठकीत अंकाची अक्षरश: चाळणी व्हायची.

काय चुकले, कोठे चुकले हे सांगताना केव्हा केव्हा त्यांचा राग अनावर होत

असे. मात्र त्यांचा हा राग फार काळ टिकत नसे. आपल्या बातमीमुळे कोणी

दुखावणार नाही याची काळजी कशी घ्यावी हे यातून शिकायला मिळाले.

अंकातील मुख्य बातमीबाबतही अनंतराव जागरूक असत. असे असले तरी

रात्रपाळीत काम करणार्‍या सहकार्‍याला त्यांनी कधीही कार्यालयात घेऊन असे

करा, तसे करा असे सांगितले नाही. रात्रपाळीत ते सहसा कार्यालयात येत

नसत. आलेच तर ‘काय विशेष’ एवढे विचारायचे. अंकातील मुख्य बातमी जर

चुकली तर मात्र दुसर्‍या दिवशीच्या बैठकीत ते स्पष्टपणे तसे सांगत व यापुढे जरा

विचार करून काम करा, अडचण आली तर विचारत जा हे सांगायला ते विसरत

नसत. यातून एक झाले ते म्हणजे पत्रकार घडत गेला. याच पद्धतीतून त्यांनी

एक ‘टीम’ तयार केली. महाराष्ट्रात सगळ्यात चांगला ‘स्टाफ’ माझ्याकडे आहे

हे अनंतराव आवर्जून सांगत. याचमुळे असेल, मराठवाड्यातील इतर पत्रकारही

‘मराठवाडा’ दैनिक कार्यालयात येत असत, ते काही तरी शिकण्यासाठीच!

कोणी कितीही टिमकी वाजवत असले, तरी वास्तव हेच की,

‘मराठवाडा’ ही पत्रकार घडविणारी आद्यशाळा होती आणि अनंतराव प्रमुख होते.

अनंतराव यांच्या हाताखाली तयार झालेले अनेक पत्रकार आज महाराष्ट्रातच

नव्हे तर देशात कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर आमचेच ‘खरे विद्यापीठ’

अशी फुशारकी मारणार्‍यांच्या दैनिकातले बहुतेक पत्रकार ‘मराठवाडा’तूनच

आलेले, हे कसे विसरता येईल. हे अनंतराव आणि ‘मराठवाडा’चे यश नाही

काय? आणीबाणी व मराठवाडा विकास आंदोलनाचा काळ हा मराठवाडा

दैनिकाचा सुवर्णकाळ होता, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.

मराठवाडा विभागावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरुद्ध जागृती निर्माण

करून त्याविरुद्ध उभे राहण्यास लोकांना शिकविण्याचे कार्य अनेक दिग्गजांनी

केले, तसे ते ‘मराठवाडा’ दैनिकानेही केले. अन्याय दूर होत नाही हे लक्षात

आल्यावर मराठवाड्यात विकास आंदोलनाने पेट घेतला. अन्याय करणार्‍या

सरकारविरुद्ध जनता रस्त्यावर आली, तेव्हा कोठे काही ओशासने सरकारने

दिली. या आंदोलन काळातील ‘मराठवाडा’चे अग्रलेख आणि बातम्या हा खरे

तर विद्यापीठीय अभ्यासाचा विषय आहे. अनंतराव यांचे सडेतोड परंतु जनतेला

कायदा हातात घेऊ नका असे हक्काने बजावणारे अग्रलेख तसेच कोठेही तोल न

जाऊ देता देण्यात आलेल्या बातम्या आजही डोळ्यांसमोर येतात.

आणीबाणीच्या काळात अनंतराव कारागृहात गेले, तेव्हा व्यवस्थापक

केशवराव देशपांडे तसेच निळू दामले, गोपाळ साक्रीकर, मोठे अरविंद वैद्य,

विजय निरखी, महावीर जोंधळे, संतोष महाजन, सुभाष वाघोलीकर आदींनी

ज्या जिद्दीने दैनिक चालू ठेवले, त्याला इतिहासात तोड नाही. अनंतराव यांनाही

याचा सार्थ अभिमान वाटत असे. ‘मला चिंता नाही’ असे अनंतराव म्हणत

ते याचमुळे. आपल्या सहकार्‍यांनी देशभर फिरावे, आणखी खूप अनुभव

होय, त्यांनीच घडवले ।

घ्यावेत, असे त्यांना वाटत असे. तसे ते बोलूनही दाखवत, परंतु दैनिकात

काम करणार्‍यांची अपुरी संख्या पाहता त्यांनाही शक्य झाले नाही. अनंतरावांचा

आणखी एक विशेष जाणवला की, ते कधी कोणत्या सहकार्‍यावर कोणती

जबाबदारी टाकतील, हे सांगता यायचे नाही. याच पद्धतीने त्यांनी कधी

गोपाळला तर कधी मोठ्या वैद्यला आपल्या केबिनमध्ये बोलावून अग्रलेख

लिहावयास सांगितले. अनंतराव यांनी मला पहिल्यांदा अग्रलेख लिहावयास

सांगितले, तेव्हा मला अक्षरश: घाम फुटला होता, पण तेव्हापासूनच मला

अग्रलेख लिहिण्याची सवय झाली. एकदा मी साहित्य संस्कृती मंडळाविरुद्ध

अग्रलेख लिहिला. दुसर्‍या दिवशी अनंतरावांनी मला बोलावले. आडनाव घेऊन

बोलावले की अनंतराव रागावले असे समजावे हे मला एव्हाना समजले होते.

मी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांचा पहिला प्रश्‍न या विषयावर कशाला लिहिले? मी

माझे म्हणणे मांडल्यावर अनंतराव रागावून म्हणाले की, या विषयावर लिहायचे

तर त्याच दिवशी लिहायचे नाही तर विषय सोडून द्यायचा. त्यावेळचे ‘महाराष्ट्र

टाइम्स’चे संपादक गोविंद तळवलकर यांचा हा विषय आहे तेव्हा ते लिहिणारच

हे आपण ओळखले पाहिजे. यापुढे असे होता कामा नये, असे त्यांनी मला

बजावलेही. कोणता अग्रलेख केव्हा लिहावा हे मला त्यावेळी समजले आणि

तेव्हापासून अशी चूक माझ्या हातून झाली नाही. एकदा त्यांनी मला बोलावले

म्हणून मी त्यांच्याकडे गेलो, तेव्हा तेथे तीन-चारजण बसलेले होते व त्यांची

काहीतरी चर्चा चालू होती. मला पाहून अनंतराव म्हणाले, ‘हेच ते महाशय

आजचा अग्रलेख लिहिणारे’ ही खास अनंतरावांची पद्धत. ::

बातमी, मुख्य बातमी, अग्रलेख, दाखल वगैरे सगळं काही अण्णांनी

अशाच पद्धतीने शिकवले. ‘असे करा, तसे लिहा’ हे त्यांनी कधी कोणाला

सांगितले नाही. पण तुम्ही जे काम केले त्याची चिरफाड करून काय हवे होते,

काय नको होते हे सांगत त्यांनी शिकवले. शिकविण्याची त्यांची ही पद्धत

खास ‘अनंतराव विद्यापीठाचीच!’ एकदा मी रात्रपाळीत असताना माझ्या हातून

मोठी चूक झाली. पहिल्या पानावरील एका महत्त्वाच्या बातमीचा काही मजकूर

शेवटच्या पानावर घ्यायचा होता. तशी माहितीची ओळ मी पहिल्या पानावर

टाकली, परंतु शेवटचे पान लावताना हा उर्वरित मजकूर लावायचे मी विसरलो.

दुसर्‍या दिवशी अंक पाहिल्यावर माझी अवस्था काय झाली हे माझे मलाच

माहीत. मी लगेच कार्यालयात गेलो. राजीनामा लिहिला. चुकीची कबुली

देऊन पाकीट अण्णांच्या घरी पाठवले. सकाळी 11 वाजता होणार्‍या बैठकीस

मी गेलो नाही. निरोप आला ‘बोलावले’ म्हणून. मी गेलो तेव्हा त्यांनी ‘अशा

चुका पुन्हा होऊ देऊ नकोस. ‘काळजी घेत जा’ असे गंभीरपणे सांगून कामावर

येण्यास बजावले. संपादकाचे मोठेपण हे असे जाणवले.

आपले सर्व सहकारी दैनिक उत्कृष्टपणे चालवू शकतात, याची खात्री

असलेल्या अनंतरावांनी त्यांच्या अखेरच्या काळात सहकार्‍यांवर विेशास का

टाकला नाही हा प्रश्‍न आज निर्माण होतो. अनंतरावांनी आपल्या सहकार्‍यांऐवजी

आयात संपादकांवर संपादकपदाची जबाबदारी का सोपविली, हे कळत नाही.

याच सुमारास अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली. या घटनेचे

वृत्त ‘मराठवाडा’ने जनतेला पटणार नाही, उलट त्यांचा राग अनावर होईल

अशा पद्धतीने दिले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. अनेक ठिकाणी

‘मराठवाडा’च्या अंकांची होळी करण्यात आली. एवढ्यावरच हे प्रकार

थांबले नाहीत, तर त्यात आणखी भरच पडत गेली. भारतीय लष्करी जवानांनी

कश्मीरमध्ये तेथील महिलांवर मोठे अत्याचार केल्याचा शोध लावून त्याचे

रसभरित वर्णन करणारे लेखही ‘मराठवाडा’त प्रसिद्ध झाले. या सर्व घटनांचे

व्हायचे तेच विपरीत परिणाम झाले. आणीबाणी व विकास आंदोलनाचा काळ

हा जसा ‘मराठवाडा’चा सुवर्णकाळ होता, तसा हा ओहोटीचा काळ होता.

‘मराठवाडा’च्या लोकप्रियतेस ओहोटी लागण्यास प्रारंभ झाला, तो येथूनच.

हे कटूसत्य नाकारता कसे येईल? आयात संपादकांऐवजी गोपाळ साक्रीकर,

अरविंद वैद्य, विजय निरखी, जयदेव डोळे, निशिकांत भालेराव हे समर्थ

सहकारी असताना त्यांना संधी दिली असती, तर निश्चितच हे घडले नसते. या

सर्व सहकार्‍यांना राजकारण, समाजकारण वगैरेची जाण आलेली होती. नेमके

काय करावे, काय करू नये, कोणती भूमिका घ्यायला पाहिजे, याचे भान व

ज्ञान आलेले असताना असे का व्हावे? कसेही असो, ही खंत काही जात नाही.

ती सलतच राहते.