गडचिरोलीमध्ये चकमकीत 26 माओवादी ठार, पोलिसांची वर्षभरातली सर्वात मोठी कारवाई

गडचिरोली,१३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- गडचिरोलीमध्ये आज  पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. सकाळपासून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये 26 माओवाद्यांचा खात्मा  करण्यात जवानांना यश आले आहे. वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

 धानोरा तालुक्यातल्या ग्यारापत्तीच्या जंगलात ही चकमक झाल्य़ाची माहिती मिळाली आहे.धानोरा तालुक्यात पोलीस पथकाकडून शोध अभियान राबवण्यात आलं. सकाळी पोलिसांच्या सी-60 पथकाचं शोध अभियान सुरू असताना लपून बसलेल्या नक्षल्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. धानोरा तालुक्यात मुरुम गावाजवळील जंगलामध्ये माओवादी मोठ्या प्रमाणात लपून बसले होते. पोलीस गस्तीवर आले असल्याचा याची माहिती मिळाली. हे सर्व माओवादी छत्तीसगडमधून आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर माओवादी विरोधी पथकाने या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले. याच दरम्यान जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली.

या चकमकीत पोलीस जवानांनी माओवाद्यांचा हल्ला परतवून लावला. दिवसभर झालेल्या धुमश्चक्रीमध्ये जवानांनी मोठ्या हिंमतीने लढा देत  26 माओवाद्यांना ठार झाले आहे. सकाळपासून झालेल्या कारवाईत मृतक माओवाद्यांची संख्या 26 झाल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्पष्ट केले आहे.नक्षलविरोधी पथकाचे 4 जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.