राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात अडीच लाख विद्यार्थी 

औरंगाबाद,१२नोव्हेंबर /प्रतिनिधी:- केंद्रीय शिक्षण विभागाने देशव्यापी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅशनल अचीव्हमेंट्स सर्व्हे २०२१) करण्याचा निर्णय घेतला असून, हे सर्वेक्षण देशभरात येत्या शुक्रवारी  करण्यात आले . या देशव्यापी सर्वेक्षणासाठी राज्यातील ७३३० शाळांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील एकूण २३४०५५ विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी झाले.औरंगाबादच्या २२८ शाळांची निवड करण्यात आली होती. 

या राष्ट्रीय सर्वेक्षणासाठी शाळा आणि विद्यार्थ्यांची निवड इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या तुकड्यांमधून केंद्र सरकारतर्फे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमधील संपादणुकीचे मूल्यांकन करणे व देशाच्या शिक्षण प्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करणे, या हेतूने हे सर्वेक्षण झाले  असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. या सर्वेक्षणाचे अहवाल जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तयार करण्यात येणार आहेत.

या सर्वेक्षणासाठीची शाळांची निवड रँडम सॅम्पलिंग पद्धतीने करण्यात आली. त्यासाठी जिल्हा नोडल अधिकारी नेमण्यात आले. त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना संबंधितांना देण्यात आल्या होत्या . सर्वेक्षणात राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा समावेश होता . शासकीय, खासगी, अनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित सर्व शाळांचे प्रतिनिधित्व यामध्ये आहे. कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकूण ११ हजार २८९ क्षेत्रीय अन्वेषक नेमण्यात आले होते .

दोन तासांची परीक्षा, तिसरी, पाचवीसाठी एकूण ४७ प्रश्न
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणादरम्यान गणित, भाषा, विज्ञान, परिसर अभ्यास, समाजशास्त्र आणि इयत्ता दहावीसाठी इंग्रजी या विषयांची केवळ दोन तासांची चाचणी घेण्यात आली. इयत्ता तिसरी आणि पाचवीसाठी ४७ प्रश्न, इयत्ता आठवीसाठी ६० प्रश्न तर इयत्ता दहावीसाठी ७० प्रश्न होते , असेही सांगण्यात आले .

महानगरपालिका औरंगाबादच्या माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी येथे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी (NAS) झाली आहे. ही चाचणी केंद्र शासनाच्या माध्यमातून होत आहे चाचणी यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, डॉ. राजेश चौधरी अधिव्याख्याता प्रादेशिक विद्या प्राधिकरण , श्रीमती वैशाली कांबळे ज्येष्ठ.अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद, प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत उबाळे सुरेखा महाजन, संगीता चौधरी प्रकाश इंगळे, किरण पवार आदी परिश्रम घेत आहे.