परीक्षा ऑफलाइन, महाविद्यालयात एनसीसी केंद्र-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

विद्यार्थ्यांच्या हितालाच शासनाचे प्राधान्य

औरंगाबाद,१२नोव्हेंबर /प्रतिनिधी:-  विद्यार्थ्यांच्या विकासाला केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्या हिताचे निर्णय शासन घेत आहे. कमवा आणि शिका, स्पर्धा परीक्षा केंद्रे, प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास करण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  उदय सामंत यांनी आज सांगितले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महात्मा फुले सभागृहात व्यवस्थापन, अधिसभा, विद्या परिषद सदस्य आणि विद्यार्थ्यांशी श्री. सामंत यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सर्वश्री आमदार विक्रम काळे, अंबादास दानवे, रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,  संचालक डॉ.धनराज माने,  तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ. ज्योती सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Displaying WhatsApp Image 2021-11-12 at 13.47.03.jpeg

मंत्री सामंत म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. दर्जेदार शिक्षणाला त्यात प्राधान्य आहे. कोविड परिस्थ‍िताचा आढावा घेऊन राज्यातील वस्तीगृहे सुरू करण्यात येतील. यंदा देशाला 86 सनदी अधिकारी राज्याने दिले. यात अधिक वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.  गरीब विद्यार्थ्यांच्या कल्याणाची कमवा व शिका योजना ताकदीने राबविण्यात येईल. या योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. सामंत यांनी सर्व विद्यापीठांना केले.

Displaying WhatsApp Image 2021-11-12 at 13.47.05.jpeg

परीक्षा ऑफलाइन, महाविद्यालयात एनसीसी केंद्र

विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाइन घेण्यात आल्या. मात्र, सध्या परिस्थिती निवळत असल्याने ऑफलाइन स्वरूपात घेण्यात येतील. अपवादात्मक परिस्थ‍िती असल्यास, आवश्यकता व गरज ओळखूनच अशा ठिकाणी ऑनलाइन परीक्षेचा विचार करण्यात येईल. राष्ट्रीय सेवा योजना प्रत्येक महाविद्यालयात आहे, त्याचप्रमाणे आता एनसीसी केंद्रही असतील, असेही श्री. सामंत म्हणाले.

प्राध्यापकांचेही लसीकरण बंधनकारक

कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोविड लसीकरण हितावह आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लशीचे दोन्ही डोस घ्यावे. तसेच प्रत्येक प्राध्यापकांनीही लशींचे डोस पूर्ण करावेत. ज्या प्राध्यापकांनी लस घेतली नाही, त्यांनीही लस घ्यावी. जे घेणार नाहीत, त्यांवर विद्यापीठाने कारवाई करावी, अशा सूचनाही श्री. सामंत यांनी कुलगुरूंना दिल्या.

Displaying WhatsApp Image 2021-11-12 at 13.47.05 (1).jpeg

विविध विषयांवर चर्चा

शिक्षक-शिक्षकेत्तर पदभरती, कंत्राटी कामगारांचे किमान वेतन, प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा,  गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण व संशोधन संस्था,  शैक्षणिक शुल्क माफी, शिष्यवृत्ती,  सार्वजनिक विद्यापीठ कायदा, विद्यापीठात शिवभोजन आदींसह विद्यापीठातील विविध प्रश्नांवर श्री. सामंत यांनी अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद सदस्यांशी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात चर्चा केली.  यावेळी शासनाचे निर्णय, विविध उपाययोजना, कार्यवाही याबाबत अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद सदस्य, विद्यार्थी यांना सविस्तर माहिती देत आवश्यक त्याठिकाणी प्रशासनाला सूचनाही श्री. सामंत यांनी केल्या.