लाच प्रकरणात पैठण तहसीलदाराचा हस्‍तक अटकेत

औरंगाबाद,१२नोव्हेंबर /प्रतिनिधी:- अवैद्य वाळू उत्खनन व वाहतूक करण्यासाठी एक लाख ३० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी दाखल गुन्‍ह्यात पैठण तहसीलदाराचा हस्‍तक नारायण रावसाहेब वाघ (३३, रा. साळीवाडा ता. पैठण) याला शुक्रवारी  पहाटे पैठण पोलिसांनी अटक केली. त्‍याला शनिवारपर्यंत दि.१३ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.पी. कदम यांनी दिले.

या प्रकरणात ३५ वर्षीय शेतकऱ्याने  फिर्याद दिली. फिर्यादी हे शेतीसह वाळू  वाहतुकीचा व्‍यवसाय भागीदारीत करतात. ते गाडेगाव (ता. पैठण) येथील परिचयाच्‍या व्‍यक्तीकडे गेले होते. त्‍या व्‍यक्तीच्‍या शेतात नुकत्‍याच झालेल्या पावसाने मोळी प्रमाणात वाळू आली होती. ती विक्री करुन आर्थिक लाभ घेण्‍यासाठी फिर्यादीने त्‍या व्‍यक्तीच्‍या शेतातील वाळु विक्रीसाठी तोंडी परवानगी घेतली. वाळु वाहतुकीची परवानगी घेण्‍यासाठी फिर्यादी हे पैठण येथील तहसील कार्यालयात गेले होते. तेथे आरोपी तहसीलदार चंद्रकांत शेळके व खाजगी इसम नारायण वाघ यांनी पंच साक्षीदार समक्ष एक लाख तीस हजार रुपये मासिक हप्त्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी त्यांच्या शासकीय चेंबर मध्ये भेट झाली असता तहसीलदार शेळके यांनी प्रत्यक्ष पंचांसमक्ष तक्रारदार यांच्या वाळूच्या गाड्या बद्दल बोलणी करून आरोपी खाजगी दलाल नारायण वाघ यांच्याकडे लाच देण्यासंबंधी सूचना केली. नारायण वाघ यांनी केलेल्या लाच मागणीचे समर्थन करून लाच घेण्यासाठी तहसीलदार शेळके यांनी प्रोत्साहन दिले. त्यानंतर पुन्हा आरोपी वाघ याने तहसीलदार शेळके यांच्या चेंबर बाहेर येऊन पंच साक्षीदार समक्ष एक लाख तीस हजार रुपये लाचेची मागणी केली.या प्रकरणात पैठण पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

या गुन्ह्यात  तहसीलदार शेळकेला औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजुर केला. मात्र वाघ हा गुन्‍हा घडल्यापासून पसार होता. त्‍याला पोलिसांनी अटक करुन आज न्‍यायायलात हजर करण्‍यात आले असता न्‍यायालयाने त्‍याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात सहायक लोकाभियोक्ता आर.सी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.