रंग दे बसंती चित्रपटाची कथा चोरल्याच्या आरोपातून दिग्दर्शक राकेश मेहरा दोषमुक्त

औरंगाबाद,१२नोव्हेंबर /प्रतिनिधी:-

‘रंग दे बसंती’ या चित्रपटाची कथा चोरल्याच्या येथील मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन यांनी केलेल्या आरोपातून चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश मेहरा यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही एच खेडकर यांनी हा निकाल दिला.
औरंगाबाद येथील रहिवासी मुश्ताक मोहसिन मुबारक हुसेन हे चित्रपट कथा लेखक असून त्यांनी रंग दे बसंती या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा व सहदिग्दर्शक रोनी स्व्रुâवाला यांच्याविरोधात कथा चोरल्याचा म्हणजेच कॉपी राईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात केला होता. या प्रकरणात सुनावणी सुरु असताना चित्रपटाचे सहदिग्दर्शक रोनी स्क्रूवाला यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या कृतीला आव्हान दिले होते. त्यात न्यायालयाने रोनी स्क्रूवाला यांच्या बाजूने निकाल दिला होता व त्यामुळे रोनी यांच्याविरोधातील गुन्हा रद्दबातल झाला होता.
त्यानंतर दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात मूळ नियमित फौजदारी प्रकरणात एक फौजदारी अर्ज (डिस्चार्ज अ‍ॅप्लिकेशन) सादर करुन राकेश मेहरा यांना कॉपी राईट कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कलमांमधून मुक्त करावे अशी विनंती केली. मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन यांचा असा दावा होता की, त्यांनी ‘इन्कलाब’ नावाची चित्रपटाची कथा लिहिली होती. ती असोसिएशनकडे रजिस्टर्ड केली होती. १९९९ साली ही कथा दिग्दर्शक राकेश मेहरा यांना ऐकवली होती. त्यानंतर मेहरा यांनी या कथेवर २००६ मध्ये ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट तयार केला आहे. ही आपल्या कथेची चोरी आहे.
न्यायालयात राकेश मेहरा यांचे वकील दीपक एस मनुरकर यांनी युक्तीवाद केला की, मुश्ताक मोहसीन यांनी त्यांची मूळ कथा रजिस्ट्रर केलेली नाही या मुद्द्यावर सहदिग्दर्शक रोनी स्क्रूवाला यांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केलेला आहे. मुश्ताक मोहसीन यांनी त्याविरुध्द वरिष्ठ न्यायालयात अपीलही केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणी कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन सिध्द होत नाही. अशा वेळी दोषारोप केल्यास तो आधारहीन (ग्राऊंडलेस) ‘रेल. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही एच खेडकर यांनी हा युक्तीवाद मान्य करीत राकेश मेहरा यांना दोषमुक्त करत  त्यांचा  डिस्चार्ज अर्ज मंजूर केला.