वैजापूर पालिकेत दोन नगरसेवक वाढणार द्विसदस्य प्रभाग पद्धत ; सदस्य संख्या 25 होणार

जफर ए.खान

वैजापूर ,१२ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- लोकसंख्येच्या प्रमाणात नगरपालिकांमध्ये सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.त्यानुसार अध्यादेश ही जारी करण्यात आला आहे.त्यामध्ये ‘अ’ ‘ब’ आणि ‘क’ वर्ग नगरपालिका क्षेत्रात कशा पद्धतीने सदस्य संख्या असणार हे निर्देशित करण्यात आले आहे.त्यानुसार ‘ब’ वर्ग असणाऱ्या वैजापूर नगरपालिकेत एक वार्ड वाढणार असून नगरसेवकांची संख्या 25 होणार आहे.

गत दहा वर्षातील लोकसंख्या वाढीचा मुद्दा लक्षात घेऊन प्रभाग रचना केली जाणार असून बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीचा अवलंब केला जाणार आहे.गेल्यावेळी प्रमाणेच दोन सदस्यांचा प्रभाग असणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार वैजापूर शहराची लोकसंख्या 42 हजार 295 एवढी होती.गेल्या दहा वर्षांत शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली असून सद्या शहराची लोकसंख्या 55 हजाराच्या जवळपास आहे.40 हजाराहून अधिक असलेल्या लोकसंख्येपैकी पाच हजार लोकसंख्येकरिता एक अतिरिक्त सदस्य वाढणार आहे.शासनाने 17 टक्के वाढीचा निर्णय घेतल्याने एक प्रभाग वाढणार आहे.त्यामुळे प्रभाग संख्या 11 वरून 12 वर होणार आहे.सध्या वैजापूर पालिकेत 11 प्रभागातून 23 सदस्यांची निवड झाली आहे.2 नामनिर्देशित सदस्य मिळून  एकूण 25 नगरसेवक आहेत.आगामी नगरपालिका निवडणुकीत लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग रचना होऊन दोन नगरसेवकांचा एक प्रभाग तयार होईल.एकूण 12 प्रभाग तयार होणार आहेत.25 नगरसेवक यातून निवडून येतील व दोन किंवा तीन नामनिर्देशित सदस्य असतील. निवडून आलेल्या नगरसेवकांमधूनच अध्यक्षांची निवड होणार आहे