महाराष्ट्र विधान परिषदेसाठी मुंबई मतदारसंघाकरिता द्विवार्षिक निवडणूक – 2021 कार्यक्रम जाहीर

मुंबई,१२ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-  भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने मुंबई मतदारसंघाकरिता दोन सदस्यांची मुदत दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी समाप्त होत असल्याने बृहन्मुंबईत दिनांक 9 नोव्हेंबर 2021 पासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांपैकी सर्वश्री रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे. त्यास्तव सदर निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 16 नोव्हेंबर 2021 (मंगळवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2021 (मंगळवार), नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021 (बुधवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2021 (शुक्रवार), मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर 2021 (शुक्रवार), मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक – 14 डिसेंबर 2021 (मंगळवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – 16 डिसेंबर 2021 (गुरूवार).

आयोगाने नमूद केल्याप्रमाणे कोविड-19 संदर्भातील विस्तृत मार्गदर्शक तत्वे तसेच यासंदर्भात अलीकडेच दिनांक 28 सप्टेंबर 2021 च्या मार्गदर्शक सूचनांमधील परिच्छेद क्र.6 येथे नमूद केलेल्या सूचनांचे निवडणूक प्रक्रियेत भाग घेणाऱ्या व्यक्तींनी पालन करणे आवश्यक असल्याचेही श्री.निवतकर यांनी सांगितले.