संपादकांचे संपादक:मैं एक कतरा हूँ तनहा बह नहीं सकता

अरविंद वैद्य

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील झुंजार सेनानी ,ध्येयवादी संपादक अनंतराव भालेराव यांच्या कार्यकर्तृत्वाचा सर्वस्पर्शी वेध घेणाऱ्या “कैवल्यज्ञानी पत्रमहर्षी अनंतराव भालेराव स्मरणग्रंथ “(संपादक :प्रवीण बर्दापूरकर )या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी अभंग प्रकाशनतर्फे केले जात आहे त्यानिमित्त अनंतरावांचे सहकारी आणि माजी संपादक अरविंद वैद्य यांचा हा लेख.

बंदूक आणि लेखणी समर्थपणे हाताळणारा कार्यकर्ता-

संपादक म्हणून अनंतराव भालेराव यांचा उल्लेख करावा लागेल.

ग्रामीण जीवनाशी असलेली नाळ, अफाट जनसंपर्क

आणि लोकांसाठी सतत उघडे असलेले दार ही त्यांची

वैशिष्ट्ये होत. यामुळेच त्यांना ‘संपादकांचे संपादक’

म्हणणे रास्त ठरेल. मागे वळून पाहताना अनंतराव आणि

‘मराठवाडा’ परिवारात व्यतीत केलेला काळ ‘सोनेरी’ होता, हे

जाणवते.

————————-

नंत भालेराव यांनी इहलोकीची यात्रा संपवून तब्बल तीस वर्ष उलटले, तरी

जनमानसात त्यांची स्मृती आजही कायम आहे. ज्या ज्या वेळी एखादा राजकीय

अथवा सामाजिक प्रश्‍न उदभवतो, त्यावेळी त्यांची प्रकर्षाने आठवण होते. अण्णांनी

1968 मध्ये  ‘मराठवाडा’ चे दैनिकात रुपांतर करुन नवीन जबाबदारी स्वीकारली

तो सारा प्रसंग आजही डोळ्यांसमोर उभाराहतो. संस्थापक संपादकाच्या मृत्यूच्या

मथळ्याने या दैनिकाचा पहिला अंक जनतेसमोर आला. ज्येष्ठ समाजवादी नेते

ना.ग.गोरे यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा झाल्याचे आठवते. एक वाचक म्हणून मी

त्या वेळी हे सारे अनुभवले. मात्र अनंत भालेराव यांची  ओळख नंतर फार पुढे झाली.मला आठवते, अनंतराव सराफ्यातील त्यांच्या कार्यालयातून घरी जाताना सायंकाळी दिसत असत. ‘मराठवाडा’चे कार्यालय त्या वेळी सराफ्यातून लोटा कारंज्याकडे जाणार्‍या एका इमारतीत होते. याच इमारतीत तत्पूर्वी माझी जुना बाजार प्राथमिक शाळा होती. ‘मराठवाडा’च्या या कार्यालयात जाण्याचा योग एकदा माझे मावसे कै.विष्णुबा गोसावी यांच्यामुळे आला त्या वेळी मराठवाडा बहुधा अर्धसाप्ताहिक असावा. विठ्ठलराव जोशी यांची त्या वेळी भेट झाली होती. पुढे पदवीधर झाल्यानंतर मी एकदा थेट अण्णांना जाऊन

भेटलो. तेव्हा ‘मराठवाडा’ दैनिक झालेले होते. माझी आपणासोबत काम

करण्याची इच्छा आहे, अशी भावना त्या वेळी मी त्यांच्याकडे व्ये केली

होती. त्यांनीही जेव्हा जागा असेल त्यावेळी अवश्य बोलावीन असे सांगितले

होते. पत्रकारितेतच काम करायचे ही भावना मनात प्रबळ असल्यामुळे बँकेतील

नोकरी सोडून मी नाशिकची वाट धरली आणि गोदाकाठी ‘गावकरी’त प्रवेशलो.

जेमतेम सहा महिने तेथे काढून मी औरंगाबादेत ‘वीरराष्ट ्र’मध्ये स्थिरावलो. पुढे

तेथूनही शिवशक्ती’त गेलो. हे दैनिक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी

अकोल्याहून औरंगाबादेत आणले होते. येथे काम करीत असतानाच एक दिवस

‘मराठवाडा’तील श्री जैस्वाल यांच्या हस्ते अण्णांची एक चिठ्ठी मला आली.

त्यात ‘येऊन भेटावे’ असे कळविले होते. त्याप्रमाणे मी त्यांना जाऊन भेटलो.

त्यांच्याशी झालेला तो संवाद मला अजूनही आठवतो. ‘राजकारणातील तुम्हाला

आवडणार्‍या दोन व्यक्तींची नावे सांगा’ असा सवाल त्यांनी केला. मी चटकन 

दोन नावे घेतली. ती होती अटल बिहारी वाजपेयी आणि जॉर्ज फर्नाडिस .

राजकारणातील दोन विरुद्ध टोकाला असलेली ही माणसे पुढे एकत्र आली, हा

विलक्षण योगायोग म्हणावा लागेल.

अण्णांसारखा लोकसंग्राहक, कायम लोकात रमणारा असा संपादक

विरळाच! अण्णांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात मोलाची भूमिका बजावली

होती. त्याच काळात ते सेलू येथे शिक्षकही होते. आता ते शिक्षक होते,

पण लोकशिक्षक होते. ही भूमिका त्यांनी अतिशय चोखपणे बजावली. त्यांनी

स्वातंत्र्यसैनिक म्हणून कुठलेही मानधन सरकारकडून घेतले नाही. आपल्याला

जे पटेल ते स्पष्टपणे मांडण्याची हिंमत त्यांच्यात होती. नामांतर आंदोलन

आणि त्या बाबतची ‘मराठवाडा’ची भूमिका हे त्याचेच उत्तम उदाहरण होय.

त्यासाठी जी किंमत मोजावी लागली, ती त्यांनी मोजली. त्याच काळात ते

स्वत: आपल्या कार्यालयात रात्री साडेबारा ते एकपयरत बसून असत कारण

वातावरण अतिशय स्फोटक होते. नामांतराला विरोध असल्याने दलित

संघटनांचा ‘मराठवाडा’वर अतिशय राग होता. अशातच एकेदिवशी रात्री ते

घरी परतले अन ‘मराठवाडा’चा फोन खणखणला. पोलिस नियंत्रण कक्षातून

सांगण्यात आले की, दलित संघटनेचा मोर्चा ‘मराठवाडा’वर येत आहे. त्या

वेळी रात्रपाळीत मी आणि माझे ज्येष्ठ सहकारी गोपाळ साक्रीकर होतो. आम्ही

‘मराठवाडा’चे लोखंडी गेट बंद करण्यास सांगितले. एवढ्यात तो संतप्त मोर्चा

दाखल झाला. आम्ही गेटजवळ गेलो, तेव्हा मोर्चेकर्‍यांच्या म्होरक्यांनी आमचा

यथेच्छ उद्धार केला. अण्णांना मोर्चा आल्याचे कळविले होतेच. तेही लगोलग

कार्यालयाकडे आले. मोर्चेकर्‍यांनी त्यांना वाट करून दिली. अण्णांनी आतून

एक टेबल आणायला सांगितले आणि त्यावर उभे राहून त्यांनी बोलायला

सुरुवात केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मीही अतिशय मानतो. माझ्या

पत्रकारितेत पहिली मुलाखत मी बाबासाहेबांचीच घेतली होती. हे त्यांनी नमूद

केले आपले म्हणणे ठामपणे मांडले आणि हा संतप्त मोर्चा नंतर अतिशय

शांतपणे परतला. हा अण्णांच्या वक्तृत्वाचा विजय होता.

1975 मध्ये इंदिराजींनी लादलेली आणीबाणी आणि तिला ‘मराठवाडा’

दैनिकाने सर्व शक्तीनिशी एवढेच नव्हे तर आपले अस्तित्व पणाला लावून

दिलेला लढा अभूतपूर्व! या घटनेने स्वातंत्र्याची जी गळचेपी झाली त्यामुळे

अण्णा अतिशय अस्वस्थ होते. दैनिकावर प्रसिद्धी पूर्व नियंत्रणाचा बडगाही

सरकारने उगारला होता. प्रसिद्धी अधिकारी रात्री येऊन दैनिकाची सारी पाने

तपाशीत. त्यांची सही झाल्यानंतरच अंक छपाईसाठी जाई. अस्वस्थ अण्णांनी

अखेर आणीबाणीविरुद्ध सत्याग्रह करण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे त्यांनी

तो केलाही. त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात झाली. तेथून सुटल्यानंतर काही

दिवसातच त्यांना आणि डॉ.बापू काळदाते यांना ‘मिसा’ खाली अटक करून

नाशिक कारागृहात पाठवण्यात आले. मधल्या काळात म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या

दिवशी अण्णांनी लिहिलेला ‘स्वतंत्र ते भगवती’ हा अग्रलेख खूप गाजला. हा

अंक सरकारने जप्त केला. अण्णांच्या पाठीमागे या काळात श्री गोपाळ साक्रीकर

यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणीबाणी विरुद्धचा संघर्ष चालू ठेवला. याच वर्षी

आम्ही ‘मराठवाडा’चा दिवाळी अंक ‘हुकूमशाही’ विशेषांक म्हणून काढला. तो

अंक खूप गाजला. त्याला पुरस्कारही मिळाला.

आपल्याकडे अलीकडेच मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीचा

सिलसिला जनाब अंतुले यांनी बहुधा 1980 साली सुरू केला. मंत्रिमंडळ

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासनांची अक्षरश: बरसात केली. आम्ही त्या

बैठकीचा वृत्तांत कार्यालयात आल्यावर अण्णांना दिला. ते ऐकल्यावर

त्यांची प्रतिक्रिया होती, ‘ही तर छप्परफाड आश्वासने आहेत.’ आम्ही नंतर

मंत्रिमंडळ निर्णयासंबंधीची बातमी केली. तिला मथळा दिला होता ‘अंतुलेंची

छप्परफाड आश्वासने.’ हा मथळा खूप गाजला. सकाळी साडेसहाच्या सुमारास

संपादकांना पहिला फोन आला, तो खुद्द मुख्यमंत्री अंतुले यांचाच. त्यांनी या

मथळ्याचे भरभरून कौतुक केले. मंत्रिमंडळ निर्णयावर भाष्य करणारा अण्णांचा

अग्रलेख अप्रतिम होता. त्याचा मथळा मला आजही आठवतो तो असा होता

‘कल्पवृक्षातळी बांधलीया झोळी’ अंतुले यांच्या दिलदार वृत्तीचे पुन्हा एकवार

दर्शन घडले. त्यांनी अण्णांना फोन करून अग्रलेखाबाबत अभिनंदन केले

आणि सुभेदारी विश्रामधामावर जेवणासाठी त्यांना आमंत्रित केले. मुख्यमंत्र्यांनी

पत्रकार परिषदेत पत्रकारांना व्ही.आय.पी बॅग वाटल्याची कुणकुण लागल्याने

अनंतरावांनी आम्हाला सूचना दिल्या, की शासकीय दैनंदिनी स्वीकारा व

बॅग नाकारा. त्यांनी हा जो संस्कार दिला तो मोलाचा ठरला. बॅग नाकारणारे

आम्ही म्हणजे साक्रीकर, फटाले, अ.आ.वैद्य व अस्मादिक एवढेच होतो, हे

नम्रपणे नमूद करायला हवे.

लोकनायक जयप्रकाश नारायण हे मुंबईच्या जसलोक इस्पितळात

असतानाची ही गोष्ट. त्यांची प्रकृती तशी चिंताजनकच होती. त्या दिवशी अण्णा

‘फुलराणी’ या नाटकाला जाणार होते. नाटकाला जाण्यापूर्वी ते कार्यालयात आले

आणि ‘जेपींच्या प्रकृतीविषयी काही गंभीर उदभवले तर मला निरोप पाठवा’

असे सांगून गेले. पावणे बाराच्या सुमारास जेपींची प्रकृती अतिशय चिंताजनक

असल्याचे वृत्त आले. लगोलग अण्णांना तसे कळवण्यात आले. ते नाटक

अर्धवट टाकून कार्यालयात परतले. त्यांनी त्या दिवशी लिहिलेला ‘अंधाराला

प्रकाश देणारे जयप्रकाश’ हा अग्रलेख अप्रतिम उतरला होता. थोडक्यात दुर्दैवाने

त्या दिवशी जेपी वारले असते, तरी तो अग्रलेख अगदी समयोचित ठरला असता

आणि सुदैवाने तसे काही घडले नाही. मात्र असे असूनही अग्रलेख वाचकांना

योग्य वाटला.

आपल्या सहकार्‍यांविषयी तुरुंगात असतानाही काळजी घेणारे ते

संपादक होते. नाशिक कारागृहात असताना त्यांनी व्यवस्थापक श्री.केशवराव

देशपांडे यांना एक पत्र पाठवले. त्यात महावीर जोंधळे आणि मी ‘अरविंद

वैद्य’ यांना वेतन कमी असल्यामुळे त्यांना रुपये पंचवीस वाढ करावी, असे

सुचविले. आम्हाला या निर्णयामुळे खूपच आनंद झाला. चाळीस वर्षांपूर्वी

पंचवीस रुपयांची वाढ आनंद वाटण्यासारखीच होती.

अण्णा समर्थ संपादक होते. एका नव्या सहकार्‍याच्या नियुक्तीवरून

थोडा वाद झाला. त्यावर सहकार्‍यांच्या बैठकीत अण्णा म्हणाले, ‘तुम्ही जर

म्हणत असाल, तर त्या नव्या सहकार्‍याचे नियुक्तीपत्र मी रद्द करतो’ अर्थात

आम्ही त्याला नकार दिला अण्णा सर्वेसर्वा होते. ते सरळ नियुक्ती करू शकत

होते; परंतु लोकशाही मार्गाचा अवलंब करून त्यांनी हा प्रश्‍न सोडविला. यातच

त्यांचे मोठेपण दिसून येते.

मिश्किल अण्णा

एक लग्न समारंभ आटोपून अण्णा, मी, व्यवस्थापक केशवराव देशपांडे,

प्रकाश चिटगोपेकर आणि अण्णांच्या पत्नी सुशीलाबाई असे खास मोटारीने

नांदेडहून औरंगाबादला परतत होतो. चोंडी पार केले आणि पावसाला सुरुवात

झाली. पाहता पाहता पावसाचा वेग खूपच वाढला. समोर दहा फुटांवरचेही

दिसेनासे झाले. ड ्रायव्हरने गाडी काही वेळ थांबवली पाऊस थोडा कमी झाला.

असे लक्षात आल्यावर आम्ही थोडे मार्गस्थ झालो. रस्त्यात एक नाला होता.

वेळ रात्रीची त्यात पाऊस त्यामुळे गाडीच्या बॉनेटपर्यंत पाणी आले आणि गाडी

इथे बंद पडली. प्रसंग बाका होता. ती गाडी आम्ही उलटी लोटली. त्यावेळी

अण्णा आपल्या पत्नीला म्हणाले, ‘तू त्या समोरच्या टेकडीवर जाऊन बस,

म्हणजे आम्ही जर वाहून गेलो, तर निदान इतरांना तुला तसं सांगता तरी येईल.’

त्या गंभीर प्रसंगातही त्यांच्या टिपण्णीने हसू आवरले नाही.

बंदूक आणि लेखणी समर्थपणे हाताळणारा संपादक म्हणून अण्णांचा

उल्‍लेख करावा लागेल. ग्रामीण जीवनाशी असलेली नाळ, दांडगा जनसंपर्क

आणि लोकांसाठी सतत उघडे असलेले दार ही त्यांची वैशिष्ट्ये होत.

यामुळेच त्यांना ‘संपादकांचे संपादक’ म्हणणे रास्त ठरेल. मागे वळून पाहताना

त्यांच्यासमवेत व्यतीत केलेला काळ सोनेरी होता हे जाणवते. त्यांच्याविषयी

भावना व्यक्त करताना मला एक उर्दू शेर आठवतो. तो असा,

सहारा लेना हीपडता है मुझको समंदर का,

मैं एक कतरा हूँ तनहा बह नहीं सकता’