वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेस सुरूवात ; प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

जफर ए.खान

वैजापूर ,१० नोव्हेंबर:- वैजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेस आजपासून सुरूवात झाली असून, या निवडणुकीसाठी 30 सप्टेंबर 2021 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन 18 जानेवारीला नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईल.
वैजापूर बाजार समितीत संचालकांची संख्या अठरा असून त्यामध्ये विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघ – 11 जागा ( सर्वसाधारण -7, महिला – 2 व इतर मागासवर्गीय -2) ग्रामपंचायत मतदारसंघ – 4 जागा (सर्वसाधारण -2,अनु.जाती/जमाती 1 व  आर्थिक दुर्बलघटक – 1) व्यापारी मतदारसंघ – 2 जागा व हमाल-मापाडी – 1 जागा अशा एकूण अठरा संचालकांचा समावेश आहे.
श्री अनिलकुमार दाबशेडे (निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, औरंगाबाद ) यांनी वैजापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सन 2021-2022 या कालावधीच्या निवडणुकीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमातील तरतुदीनुसार मतदारसंघाची यादी 30 सप्टेंबर 2021 या अर्हता दिनांकावर आधारित प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात – 1459, ग्रामपंचायत मतदारसंघात – 1116, व्यापारी मतदारसंघात – 139 व हमाल-मापाडी मतदारसंघात – 274 असे एकूण 2 हजार 988 मतदार आहेत. 6 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होईल.निवडणूक जाहीर झाल्यापासून तालुक्यातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांसह बाजार समितीचे आजी – माजी संचालकासह इच्छुक मंडळीही कामाला लागली आहे. तालुक्यात सध्या बाजार समितीत शिवसेना – काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असून,आघाडीत बिघाडी झाल्याने भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे भागीनाथ मगर यांची सभापतीपदी वर्णी लागलेली आहे.आगामी काळात मात्र परिस्थिती वेगळी राहील. यावेळी मात्र बाजार समितीची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.