पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात राज्य शासन कमतरता राहू देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंढरपूर ,८नोव्हेंबर /प्रतिनिधी:- पालखी महामार्गाच्या निर्मितीत महाराष्ट्र शासनाचा सहभाग असून या पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी ज्या काही आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्यात राज्य शासन कमतरता राहू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. तसेच वाखरी येथे वारकऱ्याकडून  रिंगण सोहळा आयोजित केला जातो. त्यामुळे वाखरी ते पंढरपूर हेही महामार्गाने जोडण्याचा केंद्र शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

May be an image of one or more people and people standing

पालखी महामार्ग तसेच महाराष्ट्रातून जाणारे रस्ते निर्मितीत महाराष्ट्र शासनाचे प्रत्येक पाऊल केंद्रासोबत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री ठाकरे यांनी करून पंढरपूरकडे म्हणजेच भक्तिमार्गाकडे जाणारे रस्ते चांगलेच असले पाहिजेत असे सांगून हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी विठूमाऊलीचा आशीर्वाद असेल असेही त्यांनी सांगितले. वारकरी संप्रदायाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वारीची परंपरा जपलेली आहे. त्या वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा निर्माण करण्यात राज्य शासनाचाही पुढाकार असेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्राच संतांची भूमी असून पंढरपूर हे विशेष प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केले. पालखी महामार्गाच्या माध्यमातून येथील सांस्कृतिक ठेवा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र शासनाच्या वतीने देशभरात विविध राष्ट्रीय महामार्गांचे निर्माण केले जात असून यामध्ये भारत माता योजना, राम गमन मार्ग, राम जानकी मार्ग, बुद्धिस्ट सर्कल, मानस सरोवर मार्ग निर्माण केले जात आहेत, असे श्री. गडकरी यांनी सांगितले.

May be an image of one or more people, people standing and flower

त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग हा 231 किलोमीटरचा असून यासाठी सात हजार कोटींची तरतूद केली आहे.  हा एकूण पाच पॅकेजमध्ये केला जात असून त्यातील चार पॅकेजचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तर संत तुकाराम पालखी महामार्गाची लांबी 130 किलोमीटर असून यासाठी पाच हजार कोटीची तरतूद केलेली असून या कामास सुरुवात झालेली असल्याची माहिती श्री गडकरी यांनी दिली.

May be an image of 5 people, people standing and indoor

राज्य शासन 1438 कोटी रुपये या महामार्गासाठी देणार  असून या महामार्गावरून वारकऱ्यांना सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

वाखरी ते पंढरपूर रस्ता पालखी महामार्गात पूर्वी समाविष्ट केलेला नव्हता परंतु या साधारण पाच किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी 74 कोटीचा निधी मंजूर करण्यात येत असून या रस्त्याचाही महामार्गात समावेश केला असल्याची माहिती श्री. गडकरी यांनी दिली.

प्रारंभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकूण 13 महामार्ग प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण आभासी प्रणालीद्वारे कळ दाबून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तत्पूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गाच्या प्रतिकृतीची पाहणी करून याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर या महामार्गाच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळा यांच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे प्रमुख श्री योगेश देसाई व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे प्रमुख श्री मोरे यांचा सत्कार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.

  • केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून वाखरी ते पंढरपूर महामार्ग करण्याचा खूप महत्त्वाचा निर्णय राज्य शासन रस्ते निर्मितीसाठी केंद्रासोबत राहील.
  • पालखी महामार्गामुळे या भागाच्या विकासाला गती मिळण्याबरोबरच दक्षिण भारताशी चांगला संपर्क राहणार.
  • पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग बनवला जाणार
  • पंढरपूरची दिंडी ही जगातील सर्वात प्राचीन यात्रा आहे.
  • पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सावली देणारे वृक्ष, शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या सोयी व पंढरपूर हे भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र करण्याचे आवाहन प्रधानमंत्री यांनी केले.
  • केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 13 महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी प्रणालीद्वारे करण्यात आले.
  • या 574 किलोमीटरच्या महामार्गासाठी 12 हजार 294 कोटीची तरतूद.
May be an image of one or more people and people standing

या 13 महामार्ग प्रकल्पाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास खासदार सर्वश्री जय सिद्धेश्वर महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, ओमप्रकाश राजे निंबाळकर , आमदार सर्वश्री प्रशांत परिचारक, बबनदादा शिंदे, चंद्रकांत पाटील, समाधान आवताडे, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह मान्यवर तसेच संत मंडळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.