रोहित-राहुलकडून स्कॉटलंडची धुलाई; भारताचा सहज विजय

Image

दुबई :-आपला 33 वा विजय साजरा करणाऱ्या विराट कोहलीला भारतीय क्रिकेट संघाने   विजयाचे  मोठे गिफ्ट दिले आहे. टी २० विश्वचषक स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यात भारताने स्कॉटलंडचा ८ विकेट राखून दणदणीत पराभव केला आहे. या विजयाबरोबरच भारताने सेमीफायनलमध्ये  पोहचण्याची आशा जिवंत ठेवली आहे. स्कॉटलंडने भारतासमोर विजयासाठी ८६ धावांचे लक्ष ठेवले  होते.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत आज भारताने अजून एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. भारताने दुबईच्या मैदानावर दुबळ्या स्कॉटलंडवर ८ गड्यांनी सहज विजय मिळवत उपांत्या फेरीचे आव्हान शाबुत ठेवले. आज आपला ३३वा वाढदिवस साजरा करणारा भारताचा कप्तान विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी ३ बळी घेत स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला मैदानावर जास्त काळ टिकू दिले नाही. प्रत्युत्तरात भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी दे-दणादण फटकेबाजी केली. राहुलने १८ चेंडूत अर्धशतक ठोकल्यामुळे भारताने हे आव्हान ६.३ षटकातंच ओलांडले. या विजयामुळे भारताने नेट रनरेटमध्ये मोठी कमाई केली. त्यांनी ग्रुप बी मध्ये सर्वात चांगला रनरेट मिळवला. रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता सर्वांचे लक्ष न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामन्याकडे लागले आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पाडाव केला, तर भारताचा मार्ग सुकर होणार आहे.

रोहित शर्मा आणि के एल राहुलने  पहिल्या षटकापासूनच धडाकेबाज फलंदाजी केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ५ षटकात ७० धावांची भागीदारी  केली. रोहित शर्मा ३० धावांवर बाद झाला त्याने १६ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार मारत 30 धावा केल्या. तर केएल राहुल ५० धावांवर बाद झाला. अवघ्या १९ चेंडूत राहुलने ३ षटकार आणि ६ चौकार मारत वेगवान अर्धशतक ठोकले . 

सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने ग्रीव्ह्सला षटकार ठोकत भारताच्या नावे ८ गड्यांनी मोठा विजय नोंदवला. या विजयासह भारताने नेट रनरेटमध्ये मोठी झेप घेतली आहे. भारताचे ४ गुण झाले असून ते आता तिसऱ्या क्रमांवर आहेत.

यानंतर विराट कोहली आणि सुर्याकुमारने 7व्या षटकात भारताचा विजय साकारला.सुर्यकुमारने षटकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले. 

स्कॉटलंडचे सलामीवीर काइल कोएत्झर आणि जॉर्ज मुन्सी यांनी डावाची सुरुवात केली. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकात स्कॉटलंडचा कप्तान काइल कोएत्झरचा (१) त्रिफळा उडवला. पॉवरप्लेच्या शेवटचे षटकात जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने धोकादायक मुन्सीला झेलबाद करत स्कॉटलंडला दुसरा धक्का दिला. मुन्सीने ४ चौकार आणि एका षटकारासह २४ धावा केल्या. सहा षटकात स्कॉटलंडने २ बाद २७ धावा केल्या. मुन्सीनंतर स्कॉटलंडचे फलंदाज बिथरले.

फिरकीपटू रवींद्र जडेजाने सातव्या षटकात दोन धक्के दिले. जडेजाने बेरिंग्टनला आणि क्रॉसलाही तंबूत धाडले. शमीने टाकलेल्या १७व्या षटकात स्कॉटलंडने तीन फलंदाज गमावले. त्याने पहिल्या चेंडूवर मॅकलिओडची (१६) दांडी गुल केली. पुढच्या चेंडूवर शरीफ धावबाद झाला. तिसऱ्या चेंडूवर शमीने अप्रतिम यॉर्कर टाकत अलास्डेअर इव्हान्सला बोल्ड केले. १८व्या षटकात स्कॉटलंडने आपला दहावा फलंदाजही गमावला. बुमराहने मार्क वॉटचा त्रिफळा उडवला. भारताने स्कॉटलंडला १० षटकांपेक्षा जास्त चेंडू निर्धाव खेळवले. स्कॉटलंडने १७.४ षटकात ८५ धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर बुमराहला २ बळी घेता आले.