समीर वानखेडेंकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढला!

मुंबई :  मुंबई ड्रग्स प्रकरणात तपास करणाऱ्या एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना आर्यन खान  प्रकरणातून हटवण्यात आलं आहे. तपास निष्पक्ष होण्यासाठी समीर वानखेड़े यांना हटवण्यात आल्याचे  बोलले जात आहे. 

आर्यन खानप्रकरणासहित सहा प्रकरणांच्या चौकशीचे अधिकार समीर वानखेडे यांच्या कडून काढण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली एनसीबीकडून केला जाईल. संजय सिंह हे या तपासकामाचे प्रमुख असतील. या प्रकरणात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. या प्रकरणांचा तपास आता संजय सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे.

नवाब मलिक यांनी यासंदर्भात ट्वीट करून ही माहिती दिली आहे.यासंदर्भात नवाब मलिक यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ही तर फक्त सुरुवात आहे, असा इशारा दिला आहे. “समीर वानखेडेंना आर्यन खानच्या प्रकरणासोबतच एकूण ५ प्रकरणांच्या तपासातून हटवण्यात आलं आहे. अशी एकूण २६ प्रकरणं आहेत ज्यांचा तपास होणं आवश्यक आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी खूप काही करण्याची गरज आहे. आणि आम्ही ते करू”, असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे.

समीर वानखेडे यांनी केलेला तपास आणि आर्यन खानवर केलेली कारवाई हा बनाव असून समीर वानखेडेंनी बॉलिवुड सेलिब्रिटींकडून वसुली केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. यासंदर्भात खूप सारे फोटो आणि व्हॉट्सअॅप चॅट्स देखील नवाब मलिक यांनी सातत्याने त्यांच्या पत्रकार परिषदांमधून जाहीर केले होते.

आपणाला तपासातून हटवण्यात आलेलं नाही.तर माझ्याच मागणीवरून हा तपास दिल्ली एनसीबी दिल्लीकडे  सोपवण्यात आला असल्याची  प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी दिली आहे.