एक्स्पो 2020 दुबई येथील भारतीय दालनाला दोन लाखाहून अधिक लोकांची भेट

भारतीय दालन हे सर्वाधिक भेट दिलेल्या दालनांपैकी एक

1 ऑक्टोबर 2021 रोजी वाणिज्य तसेच उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या भारतीय दालनाने दुबई येथील एक्स्पो 2020 मध्ये पहिला महिना यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

भारतीय दालनाला 3 नोव्हेंबरपर्यंत 2,00,000 हून अधिक अभ्यागतांनी भेट दिली असून भारताच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी विविध क्षेत्र आणि राज्यांशी संबंधित विशिष्ट सत्रांचे देखील या दालनात आयोजन करण्यात आले. या दालनामुळे देशाला गुंतवणुकीच्या संधी देखील प्राप्त  झाल्या आणि अभ्यागतांना आकर्षित करण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दुबईतील भारताचे महावाणिज्य दूत आणि उप. एक्स्पो 2020 दुबई मधील भारताचे  उपमहाआयुक्त डॉ. अमन पुरी भारतीय दालनाच्या यशाबद्दल म्हणाले, ” ऑक्टोबर महिना भारतीय दालनासाठी खूपच चांगला होता आणि या दालनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांची संख्या वाढल्याचे आम्ही पाहिले असून येत्या काही महिन्यांत ही गती कायम राहण्याची अपेक्षा करतो.”

दालनाची सुरुवात 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान हवामान आणि जैवविविधता सप्ताहाने झाली. या सप्ताहानंतर अवकाश आणि शहरी आणि ग्रामीण विकास सप्ताह सुरू झाले, ज्यात क्षेत्रांचे भविष्य, या क्षेत्रातील समस्या आणि आव्हाने, सरकारची भूमिका तसेच नियम आणि प्रोत्साहनाविषयी चर्चा करण्यात आली.

विशिष्ट क्षेत्रांशी संबंधित सप्ताहांव्यतिरिक्त भारतीय दालनात गुजरात, कर्नाटक आणि लडाखच्या केंद्रशासित प्रदेशांसाठी विशिष्ट सप्ताहांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

भारतीय दालनात ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि नवरात्रीच्या उत्सवादरम्यान सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. भारतीय दालनात सुरू असलेल्या दिवाळी उत्सवामध्ये रंगीबेरंगी रचनांची मांडणी, स्वरांगोळी किंवा एलईडी रांगोळीच्या स्वरूपात प्रकाशयोजना, फटाक्यांचे आभासी प्रदर्शन आणि आघाडीच्या कलाकारांचे सादरीकरण यांचा समावेश आहे.