केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते ‘तुम्ही बी घडा ना’ चे दिल्लीत प्रकाशन

औरंगाबाद,३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-पत्रकार दत्ता जोशी लिखित ‘तुम्ही बी घडा ना’चे औपचारिक प्रकाशन काल मंगळवारी सकाळी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते साजरे झाले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्व कार्यकर्त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रातिनिधिक आढावा घेणाऱ्या, परिषदेच्याच पूर्व कार्यकर्त्याने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन परिषदेचाच पूर्व कार्यकर्ता असलेल्या आणि देशाच्या गृहमंत्रीपदी विराजमान असलेल्या अमित शहा यांच्या शुभहस्ते व्हावा हा योग सहजसाध्य नसतो.

या पुस्तक प्रकाशन प्रसंगी अमित यांच्या समवेत ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय संघटनमंत्री श्री. संजय पाचपोर, पुस्तकाचे प्रकाशक दत्ता जोशी , उद्योगपती आणि पोलाद उद्यमिता प्रतिष्ठानचे श्री. सुनील गोयल, ‘डिक्की’चे संस्थापक व ‘आयआयएम’ जम्मू चे चेयरमन पद्मश्री श्री. मिलिंद कांबळे, वनवासी कल्याण आश्रमाचे केंद्रीय प्रशासकीय संपर्क प्रमुख श्री. शरद चव्हाण आणि मध्य आशियाच्या अभ्यासक, जेएनयू मधील प्राध्यापिका डॉ. रश्मीनी कोपरकर हे उपस्थित होते.