सावत्र बाप व त्याच्या मित्रांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्त्याचार ; सख्या आईसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर ,३ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- पायाची शस्रक्रिया झाली म्हणून वैजापूरला सख्या आईकडे राहण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर तिचा सावत्र बाप व शेजारी राहणाऱ्या त्याच्या मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची घटना वैजापूर शहरातील मोंढा मार्केट परिसरात घडली असून, हे घृणास्पद कृत्य करण्यासाठी सहमती असलेल्या सख्या आई व सावत्र बापासह अन्य एकाविरुध्द वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14 वर्षीय पीडित मुलगी ही औरंगाबाद येथे एका वसतिगृहात राहून शिक्षण घेते.पायाची शस्रक्रिया झाल्याने ती वैजापूर येथे मोंढा मार्केट परिसरात राहणाऱ्या तिच्या आईकडे राहण्यासाठी आली होती. गेल्या वर्षभरापासून ती येथे वास्तव्यास होती. सावत्र बापाची तिच्यावर वाईट नजर होती. मुलीसोबत तो अश्लील चाळे करीत असे.घराशेजारी राहणारा त्याचा मित्रही तिचा लैंगिक छळ करीत होता. सावत्र बाप व शेजारी राहणाऱ्याकडून होणाऱ्या त्रास व लैंगिक अत्याचाराबाबत तिने आपल्या आईला सांगितले. आईने मुलीची साथ न देता शेजारी राहणारा जसे सांगतो तसे कर असे म्हणून मुलीलाच मारहाण करीत असे.गेल्या आठवड्यात सावत्र बापाने तिच्या गुप्तांगात मिरचीची पूड टाकून घृणास्पद प्रकार तिच्यासोबत केला. सावत्र बाप व शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ती शहरातील लक्ष्मीनगर येथे  आपल्या मावशीकडे पळून गेली.मावशीकडे गेल्यानंतरही शेजाऱ्याने तिचा पिच्छा सोडला नाही. शेजारी दादागिरी करून जास्तच त्रास देत असल्याने पिडीत मुलगी व तिच्या मावशीने पोलीस ठाण्यात जाऊन सावत्र बाप व शेजाऱ्यांकडून होणाऱ्या छळाची माहिती दिली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून तिचा सावत्र बाप व सख्या आईसह अन्य एकाविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.